धार्मिक स्थळांची सुरक्षा : काही न सुटलेले प्रश्‍न

0

जोथपूरला चामुंडादेवी, शबरीमलाई आणि मांढरदेवीला शेकडो भाविक चेंगराचेंगरीत मारले जातात. देवदर्शनाला जाणार्‍या शेकडो वाहनांचा अपघात होऊन निरागस बालकांचा मृत्यू होतो. एवढेच काय पुजार्‍यांचेही खून होतात. अशावेळी देवाची भूमिका काय असते? हा प्रश्‍न सरळ नास्तिक वर्गात टाकला जातो. सैतानाला दगड मारण्याच्या अंधश्रद्धेपोटी शेकडो माणसे मक्का मदिना येथे मरतात. कधी धावपळ तर कधी आगीच्या भक्ष्यस्थानी भाविक पडत आहेत. परंतु, जगाचा तारणहार या सगळ्यांचे रक्षण का करीत नसावा? अशा प्रश्‍नाला मात्र धार्मिक क्षेत्रात कधीच वाव मिळत नाही, असा अनुभव आहे. जो जगाचा निर्माता आणि रक्षणकर्ता समजला जातो, त्याच्या रक्षणाचा एवढा अवाढव्य खर्च शासन यंत्रणा का उचलते?

आपल्या देशात सध्या माणसांपेक्षा देवच सुखी आहेत. वर्तमान आणि भविष्याची कोणतीही चिंता नसणार्‍या सर्वच धर्मातल्या देवांची काळजी मात्र माणसाच्या तुलनेत अधिकच घेतली जात आहे. एकवेळ इथला माणूस उपाशी झोपला तरी चालेल. परंतु, पंच पक्वान्नाची ताटे दाखविल्याशिवाय मंदिरे बंद होऊ नयेत, याची काळजी काही लोक घेताना दिसतात. हे सगळे केवळ हिंदू धर्मात घडते असे नाही. जगातल्या सगळ्याच धर्मात कमी अधिक प्रमाणात ते घडत आहे. याशिवाय आपल्या देशात साक्षात, जागृत देवांचीही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा आणि काही ठिकाणी नव-नव्या देवांची संस्थाने अचानक उदयाला येत आहेत. तर काहींचे जीर्णौद्धार होताना दिसतात. हे सगळे धार्मिक आणि पापभिरू माणसाला सुखावणारे चित्र असले तरी उपजत प्रश्‍न निर्माण होणार्‍या मेंदुतल्या झडपा त्यामुळे क्षतिग्रस्त होत आहेत. या प्रवाहात वाहून जाणार्‍या कोणत्याही समूहाला अलीकडे कोणतेच प्रश्‍न पडत नाहीत, हे चांगले लक्षण म्हणता येणार नाही.
आभासाच्या आधारावर ज्यांची अनुभूती होते आणि व्यक्ती कायमचे मानसिक स्वातंत्र्य गमावून बसतो, अशा देवांच्या बाबतीत आपण बोलतोय. जे जिवंत आहेत आणि बुवाबाजीचा उद्योग करताहेत, त्यांचा विषय वेगळा आहे. आपल्यापैकी अनेकजण कदाचित अशा भोंदुंवर विश्‍वास सुद्धा ठेवत नसावेत. मात्र, देवाचा विषय आपण संवेदनशील करून ठेवला आहे. ‘श्रद्धा’ या गोंडस नावाखाली अनेक पिढ्या आपण त्याला बळी पडतोय. जागतिक पातळीवर विचार केला तर जग एका विनाशाच्या ढिगार्‍यावर बसल्याचे दिसते, सगळीकडे रक्तपात होताना दिसतो आणि त्याला देव, अल्लाह किंवा प्रेषितांचे संबंध आपल्यापरीने जोडले जात आहेत. याचा अर्थ सध्याच्या काळात माणूस अधिक असुरक्षित बनला आहे. घातपात, अपघात किंवा हल्ला यात आपण सापडणारच नाही, याची कुणीही शाश्‍वती देऊ शकत नाही. अशा वळणावर आपण आलो आहोत. भारतासारख्या देशाचे कितीतरी अर्थसंकल्प मांडले जातील, एवढी संपत्ती धार्मिक स्थळांवर एकवटली आहे. म्हणूनच अशा गडगंज श्रीमंत देवांच्या सुरक्षा व्यवस्था सुद्धा कडेकोट केल्या जात आहेत. एकट्या महाराष्ट्राचा विचार केल्यास शिर्डी, तुळजापूर, सिद्धिविनायक, कोल्हापूर, शेगाव आणि पंढरपूर या मंदिरांच्या सुरक्षा व्यवस्था मजबूत आहेत. खासगी रक्षक, पोलीस आणि वरून सीसीटीव्ही कॅमेरे यांचेही पहारे आहेतच. तरीही धार्मिक स्थळांवर होणार्‍या चोर्‍या थांबत नाहीत. याबात कुणालाच अलीकडे प्रश्‍न पडत नाहीत. जागृत अशी ख्याती असणार्‍या देवांच्या अंगावरील दागिने चोरीस जातात. सोन्या-चांदीचे डोळे काढले जातात आणि काही मूलभूत प्रश्‍न पडण्याऐवजी भक्तांचे पोलीस ठाण्यावर मोर्चे निघतात. बिच्चार्‍या पोलिसांना अनेकदा वर्गणी काढून तणाव निवळावा यासाठी दागिने आणावे लागतात. अशा घटना घडल्यावर एकही भक्ताला असा प्रश्‍न पडत नाही की, देव जागृत असेल तर चोरी कशी होते? अलीकडे मुंबईतल्या एका मंदिर व्यवस्थापनाने मुख्यमंत्र्याना एक निवेदन देऊन मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची विनंती केली. हे शिष्टमंडळ निघून गेल्यावर एका वरिष्ठ सनदी अधिकार्‍याने दिलेली प्रतिक्रिया मोठी मार्मिक होती. तो मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हणाला, साहेब यांचे देवस्थान एवढे जागृत असेल तर आपण मर्त्य मानव देवाची सुरक्षा कशी करणार? अर्थात त्यानंतरच्या हास्यात मुख्यमंत्रीही सामील झाले. गाडगेबाबा अशा प्रसंगावर मोठा रोकडा प्रश्‍न विचारीत असत. जो देव स्वतःच्या नैवेद्यावरचे कुत्रे हाकलू शकत नाही, तो तुमची संकटे काय हाकलणार? जोथपूरला चामुंडादेवी, शबरीमलाई आणि मांढरदेवीला शेकडो भाविक चेंगराचेंगरीत मारले जातात. देवदर्शनाला जाणार्‍या शेकडो वाहनांचा अपघात होऊन निरागस बालकांचा मृत्यू होतो. एवढेच काय पुजार्‍यांचेही खून होतात, अशावेळी देवाची भूमिका काय असते? हा प्रश्‍न सरळ नास्तिक वर्गात टाकला जातो. सैतानाला दगड मारण्याच्या अंधश्रद्धेपोटी शेकडो माणसे मक्का मदिना येथे मरतात, कधी धावपळ तर कधी आगीच्या भक्ष्यस्थानी भाविक पडत आहेत. परंतु, जगाचा तारणहार या सगळ्यांचे रक्षण का करीत नसावा? अशा प्रश्‍नाला मात्र धार्मिक क्षेत्रात कधीच वाव मिळत नाही, असा अनुभव आहे. जो जगाचा निर्माता, रक्षणकर्ता समजला जातो त्याच्या रक्षणाचा एवढा अवाढव्य खर्च शासन यंत्रणा का उचलते? साधी गोष्ट मंदिरातल्या दानपेट्या साखळदंडात जर बांधाव्या लागत असतील तर आणि पाणपोई वरील ग्लासांना भोके पाडावी लागत असतील तर आपण कोणत्या जागृत देवाची आराधना करतोय? याचा विचार करण्याची गरज आहे. हाडामासाचे देव वार्‍यावर सोडून वेळप्रसंगी कुपोषणाच्या हवाली करून असे कोणते पुण्य आम्ही पदरात पाडून घ्यायला उतावीळ झालो आहोत ?

पुरुषोत्तम आवारे पाटील
9892162248