धार्मिक स्थळांवर कारवाई करू नये!

0

पिंपरी-चिंचवड : चिंचवड, बिजलीनगर, शिवनगरी येथील ओंकार गणेश मंदिर तसेच तुळजाभवानी मंदिर या धार्मिक स्थळांवर कारवाई करू नये, अशी मागणी घर बचाव संघर्ष समितीच्या पदाधिकार्‍यांनी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण प्रशासनाकडे केली आहे. या मागणीचे निवेदन नुकतेच समितीच्या वतीने झोन तीनचे क्षेत्रिय अधिकारी अनिल व्ही. दुधलवार यांना दिले. महापालिका आणि प्राधिकरण प्रशासन धार्मिक स्थळांवर कारवाई न करण्याबाबत सकारात्मक असल्याचे घर बचाव संघर्ष समितीचे समन्वयक विजय पाटील यांनी सांगितले.

600 पेक्षा जास्त हरकती
चिंचवड, बिजलीनगर, शिवनगरी येथील ओंकार गणेश मंदिर तसेच तुळजाभवानी मंदिर या धार्मिक स्थळांना अति उच्च दाबवाहिनीखाली असल्याचे सांगत ती मंदिरे काढण्यासाठी प्राधिकरणाने नोटीस दिली होती. तसेच 17 नोव्हेंबर 2017 पर्यंत ही धार्मिक स्थळे काढून घेण्याच्या सूचना नोटिसीद्वारे देण्यात आल्या होत्या. मात्र, याला घर बचाव संघर्ष समितीच्या पदाधिकार्‍यांनी व नागरिकांनी तीव्र विरोध केला. त्याबाबतच्या 600 पेक्षा जास्त रहिवासी भक्तांच्या हरकती प्राधिकरण प्रशासनाकडे जमा केल्या होत्या. धार्मिक स्थळांवर कारवाई करू नये, याबाबत हरकती नोंदविण्यात आल्या आहेत.

आयुक्तांची भूमिका सकारात्मक
यासंदर्भात बोलताना घर बचाव संघर्ष समितीचे समन्वयक विजय पाटील म्हणाले, महापालिकास्तरीय समिती अध्यक्ष आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भूमिका बिजलीनगर, शिवनगरी मंदिराबाबत सकारात्मक आहे. यामुळे परिसरातील हजारो गणेशभक्त आनंदी झाले आहेत. प्रशासनाची पाऊले सकारात्मक पडत असल्याचे दिसून येत आहे. धार्मिक श्रद्धेचा आणि लोकभावनेचा विचार प्रशासन नक्कीच सकारात्मक करेल यात शंका नाही, असे त्यांनी सांगितले. यावेळी घर बचाव संघर्ष समितीचे उमाकांत सोनवणे, विजय पाटील, रेखा भोळे, अमोल हेळवर आदी उपस्थित होते.