धार्मिक स्थळांसंदर्भात प्राधिकरणाकडे 650 हरकती

0

पिंपरी-चिंचवड : शिवनगरी, चिंचवडेनगर येथील धार्मिक स्थळे उच्च दाबाच्या वाहिनीखाली असल्याचे कारण देत पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून संबंधित धार्मिक स्थळे निष्कासित करण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. या धार्मिक स्थळांसंदर्भात काही हरकती असल्यास, त्या हरकती 10 ऑगस्टपर्यंत नोंदविण्याचे आवाहन प्राधिकरण प्रशासनाने केले होते. त्यानुसार, घर बचाव संघर्ष समितीच्या वतीने सुमारे 650 हरकती व सूचना प्राधिकरण प्रशासनाकडे दाखल करण्यात आल्या आहेत. या हरकती व सूचना प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांना दिल्या आहेत.

मुख्याधिकार्‍यांची घेतली भेट
प्राधिकरणाच्या कार्यालयात जाऊन घर बचाव संघर्ष समितीच्या सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांची भेट घेतली. या प्रसंगी घर बचाव संघर्ष समितीचे समन्वयक विजय पाटील, रेखा भोळे, हनुमंत वाबळे, आबा सोनवणे, किरण पाटील, राजेंद्र देवकर, शिवाजी इबितदार, राजेंद्र चिंचवडे, नारायण चिघळीकर, विशाल बाविस्कर, चंद्रिका निवडुंगे, वैशाली कदम, रेखा पडोळ, रजनी पाटील, शुभांगी चिघळीकर, माणिकराव सुरसे, संतोष चिघळीकर, संदीप कांबळे, हंसराज चिघळीकर, संभाजी जराड, बाळुराम शर्मा उपस्थित होते.

अनेक धार्मिक स्थळांवरील कारवाई स्थगिती
याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार प्राधिकरणाच्या हद्दीतील अनधिकृत धार्मिक स्थळांचे सर्वेेक्षण महापालिका व संबंधित स्वायत्त संस्थांचे अधिकारी करीत आहेत. त्यापैकी अनेक धार्मिक स्थळांवरील कारवाई स्थगित करण्यात आली आहे. संबंधित धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीने त्याकरिता सहकार्य करावे. आपल्या हरकती, सूचना व प्रस्ताव परीक्षण समितीकडे देण्यात येणार आहे, असे खडके यांनी सांगितले.

…तर कारवाई टाळता येईल
घर बचाव संघर्ष समितीचे समन्वयक विजय पाटील म्हणाले की, ही धार्मिक स्थळे गेल्या 15 वर्षांपासून नागरिकांचे श्रद्धास्थान आहेत. त्यासाठी सुरक्षा उपायांचे नियोजन महावितरण कंपनीने केल्यास त्या धार्मिक स्थळांवरील कारवाई टळू शकणार आहे. महापालिकेने त्याबाबतचा सकारात्मक व सहानुभूतीपूर्वक अहवाल प्राधिकरण प्रशासनाला त्वरित कळवावा, अशी मागणी विजय पाटील यांनी केली.