By faking an accident, a businessman in Jalgaon was robbed of two and a half lakhs जळगाव : उद्योजकाच्या धावत्या कारला मागच्या बाजूने धडक देऊन अपघाताचा बनाव करत चाकूच्या धाकावर मारहाण करून अडीच लाखांची रोकड लांबवण्यात आली. शनिवार, 20 ऑगस्टच्या रात्री दहा वाजेच्या सुमारास एमआयडीसी परीसरात ही घटना घडल्ी.
ऑईल व्यावसायीकास लुटले
अमित बद्रीप्रसाद अग्रवाल यांची एमआयडीसी परीसरात विनायक ऑईल कार्पोरेशन नावाचा सोया रीफाईंड तेलाच्या होलसेल विक्रीचा उद्योग आहे. शनिवार, 20 रोजी रात्री दहा वाजता नेहमीप्रमाणे अमित अग्रवाल हे त्यांचे वडील व कार चालकासह कारने घरी येण्यास निघाले असताना त्यांच्यासोबत दिवसभराच्या तेल विक्रीचे दोन लाख 49 हजार 800 रुपये होते. रस्त्यात वीज कंपनीच्या सब स्टेशनजवळ एका दुचाकीने त्यांच्या कारला मागच्या बाजूने धडक दिली. या धडकेत कुणाला काही लागले आहे का हे बघण्यासाठी अमित अग्रवाल हे खाली उतरले असता त्यावेळी बाजुला एक मोटार सायकल पडलेली असल्याचे त्यांना दिसले. त्या मोटार सायकलजवळ तीन इसम त्यांना दिसले. तिघांपैकी दोघे त्यांच्याजवळ आले. आम्हाला खूप लागले असून आम्हाला वैद्यकीय उपचारासाठी पैसे द्या असे म्हणत त्यांनी पैशांची मागणी केली. वैद्यकीय उपचार करुन देण्याची अग्रवाल यांनी तयारी दर्शवली मात्र पुढच्याच क्षणी त्यातील एकाने अमित अग्रवाल यांची कॉलर पकडून त्यांना चाकूचा धाक दाखवला. या घटनेत अग्रवाल यांची सोडवणूक करण्यासाठी त्यांचा कारचालक रामेश्वर घुले हा पुढे आला. त्यावेळी त्याने अग्रवाल यांना सोडून कार चालकाच्या गळ्याला चाकू लावत जीवे मारण्याची धमकी देत त्याचा मोबाईल हिसकावून घेतला. दुसर्याने दरम्यानच्या कालावधीत कारमधील रोख रकमेची पिशवी काढून घेतली.
अन्य तिघांनी लांबवली रोकड
यावेळी अन्य दुचाकीवर तीन संशयीत आले व त्यांनी रोख रकमेची पिशवी लांबवली व नंतर संशयीत पसार झाले. चाकूचा धाक दाखवणार्याने अग्रवाल यांच्या खिशातील दोन मोबाईल व बँकेचे एटीएम कार्ड तसेच चालकाचा मोबाईल घेत पलायन केले. एकून दोन लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल टोळक्याने लांबवला. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांनी भेट दिली. पुढील तपास सहा.निरीक्षक अमोल मोरे व त्यांचे सहकारी करत आहेत.