धावत्या रेल्वेखाली तरूणाची आत्महत्या

0

जळगाव : धावत्या रेल्वेखाली अनोळखी तरूणाने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी 07.30 ते 08 वाजेदरम्यान शिरसोली जळगाव रेल्वेलाईनवर घडली होती. पोलिसांनी हा मृतदेह रूग्णालयात हलविला. दरम्यान बुधवारी सकाळी तरूण हरविल्याची तक्रार देण्यासाठी दोन जण रामानंदनगर पोलिसात आले. मिसिंग झालेला तरूणाच्या नातेवाईकांनी पोलिसांनी सर्पर्क साधल्यानंतर मृत तरूणाची दुपारी ओळख पटली. अंकित संजय पाटील (22) आनंदनगर मोहाडी रोड असे मृत तरूणाचे नाव आहे. कुटुंबीयांच्या माहितीनुसार अंकित पाटील हा गेल्या पंधरा दिवसांपासून के.बी.एक्स. कंपनीत कार्यरत होता.

दरम्यान काल दुपारी तो घरी होता. सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास बाहेरून येतो,असे कुटुंबीयांना सांगून घराबाहेर पडला. दरम्यात त्याचा मोबाईल तसेच त्याची दुचाकी त्याने घरीच ठेवली होती. रात्री अकरा वाजेपर्यंत तो घरी परतला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याच्या मित्रांकडे चौकशी केली तसेच कॉलनीत व शहरात शोध घेतला असता मिळून आला नाही. दरम्यान मंगळवारी सायंकाळी साडेसात ते आठ वाजेदरम्यान शिरसोली जळगाव डाऊन लाईनवरील खांबा क्रमांक 415/11 ते 415/13 च्या दरम्यान धावत्या रेल्वेखाली तरूणाचा मृत्यू झाल्याची खबर उपस्टेशन प्रबंधक आर.के. पालरेचा यांनी रामानंदनगर पोलीस स्टेशनला दिली. त्यानुसार कर्मचारी मनोज इंद्रेकर तसेच विलास पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. मयताच्या खिशात काही एक मिळून आले नाही. तरूणाचा मृतदेह रूग्णालयात हलविण्यात येऊन अनोळखी व्यक्तीचा मृत्यू म्हणून रात्री अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान आज सकाळी रामानंदनगर पोलिसात दोन जणांनी तरूण हरविल्याची मिसिंग दाखल केली. आज दुपारी ठाणे अंमलदार संभाजी पाटील यांना मनोज इंद्रेकर यांनी संपर्क साधून मिसींग दाखल आहे का ? अशी विचारणा केली. त्यावेळी पाटील यांनी संबधीत नातेवाईकांचा मोबाईल नंबर देऊन तरूण मिसींग असल्याची माहिती दिली. त्यानंतर इंद्रेकर यांनी मोबाईलवर संपर्क साधून नातेवाईकांना आज दुपारी तीन वाजता जिल्हा शासकीय रूग्णालयात बोलवून घेतले. तरूणाचा मृतदेह तसेच त्याने परिधान केलेला अंडरवियर, बनियान तसेच चप्पल वरून तरूणाची ओळख पटली. मृत अंकित पाटील याचे वडिल संजय विश्वनाथ पाटील (52) हे गाडेगाव येथील सुप्रीम कंपनीत कार्यरत आहेत. तर लहान भाऊ अक्षय हा डिप्लोमा करत आहे. आई गृहिणी आहे. घटनेची माहिती कळाल्यानंतर नातेवाईकांनी रूग्णालयात गर्दी केली होती. तरूणाच्या अकस्मात मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करण्यात आली.