जळगाव। पिण्याचे पाणी घेण्यासाठी स्टेशन परिसरातून हंडा डोक्यावर घेऊन येत असलेल्या महिलेला धावत्या रेल्वेचा धक्का लागून जखमी झाल्याची घटना बुधवारी घडली. जखमी महिलेच्या मदतीला कोणीही धावून न आल्याने उठतबसत तिने निवास गाठले. नंतर तिच्या मुलाने तिला उपचारार्थ सिव्हीलमध्ये दाखल केले. इंदुबाई अवधूत सोनवणे (वय-45) या कुटुंबासह गेंदालाल मिल परिसरात वास्तव्यास आहेत. नळांना पाणी न आल्याने घरात पिण्याचे पाण्याची आवश्यकता होती. त्यामुळे इंदुबाई या हंडा घेऊन रेल्वेस्टेशन फलाकवर गेल्या होत्या. पाण्याचा हंडा भरून त्या रेल्वे रूळ क्रॉस करत असताना धावत्या रेल्वेचा धक्का त्यांना लागून त्या जमिनीवर कोसळल्या. ही घटना आज सकाळी साडेआठ ते पावणे नऊ वाजेच्या सुमारास घडली.जखमी अवस्थेतच महिलेने घर गाठले. यानंतर मुलगा योगेश सोनवणे यास घटनेची माहिती मिळताच त्याने घराकडे धाव घेऊन जखमी आईस सिव्हीलमध्ये हलविले. महिलेच्या डोक्याला आणि उजव्या हाताला जबर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
धावत्या रेल्वेतून पडून तरूण गंभीर जखमी
जळगाव । सुरतकडून बिहारकडे जात असलेल्या परप्रांतीय तरूण धावत्या रेल्वेतून पडल्याची घटना बुधवारी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास पाळधी रेल्वेस्थानकाजवळ घडली. दरम्यान, जखमी तरूणास जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून त्याच्या डोक्याला जबर मार बसला आहे. बिहार येथील रहिवासी कमलेश बाबूलाल यादव (वय-35) हा तरूण ड्रायव्हर म्हणून कामाला आहे. बुधवारी बिहार येथे जाण्यासाठी तो सुरत येथून ताप्तीगंगा या रेल्वेत बसला. यानंतर सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास कमलेश हा धावत्या रेल्वेतून पाळधी रेल्वेस्थानकाजवळ पडला. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून तो रक्तबंबाळ अवस्थेत पडून होता. स्टेशनमास्टर यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी याबाबत तेथील कर्मचार्यांना कळवून कमलेश याला रूग्णवाहिकेतून जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले.