धावत्या रेल्वेतच प्रवाशांना मिळणार कन्फर्म तिकीट

भुसावळ : धावत्या रेल्वेतच वेटींग तिकीट असलेल्या प्रवाशांना आता कन्फर्म तिकीट दिली जाणार आहे. भुसावळ-अमरावती एक्स्प्रेससाठी पहिल्या टप्प्यात दहा मशीन भुसावळ विभागाला प्राप्त झाले असून एकूण 454 मशीनची मागणी नोंदवण्यात आली आहे. तिकीट निरीक्षकांच्या हाती हॅण्ड हेल्ड टर्मिनल (एचएचटी) मशीन असणार असून रेल्वेत कन्फर्म तिकिटासाठी या यंत्राचा वापर होईल. धावत्या रेल्वेत एखादी सीट रीकामी असेल तर त्याची नोंद यंत्रामध्ये केली जाईल. रेल्वेतच प्रवाशाच्या मागणीनुसार कन्फर्म तिकीट दिले जाईल. अनेकदा तपासणीसाला हाताशी धरून प्रवासी विनातिकीट प्रवास केला जातो मात्र आता या यंत्रामुळे या प्रकारांना आळा बसणार आहे.

अमरावती एक्सप्रेसमध्ये विभागातून पहिला प्रयोग
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील गाडी क्रमांक 12113/12111 अमरावती-मुंबई-अमरावती एक्सप्रेसमध्ये शुक्रवार, 8 जुलैपासून हा प्रयोग राबवण्यास सुरूवात झाली. रेल्वे प्रवासात अनेकदा वाढत्या गर्दीमुळे प्रवाशांचे तिकीट वेटींगवर असते मात्र या एचएचटी मशीनमुळे प्रवाशांना आता कन्फर्म बर्थ मिळण्याची प्रक्रिया सुलभ झाली आहे.

रेल्वेकडे होणार ऑनलाईन नोंद
प्रवासादरम्यान विनातिकीट प्रवाशांना तपासणीसाकडून दंडाच्या पावत्या लिहून दिल्या जातात. जनरलचे तिकीट काढून स्लीपर बोगीत बसलेल्यांनाही अतिरीक्त प्रवास शुल्काची पावती द्यावी लागते. यासह अनेकविध कारणांसाठी तपासणीसाला पावत्या फाडाव्या लागतात. हे काम आता एचएचटी यंत्राद्वारे केले जाईल. ही यंत्रे ऑनलाईन प्रणालीद्वारे रेल्वेच्या सर्व्हरला जोडलेली असतील. पैसे दिल्यानंतर यंत्रातून त्याची पावती निघेल. त्याची ऑनलाइन नोंद रेल्वेकडे होईल. रेल्वेच्या अन्य विभागात ही यंत्रे यापूर्वी दाखल झाली असलीतरी भुसावळ विभागात मात्र शुक्रवार, 8 पासून अमरावती-मुंबई एक्सप्रेसमधून त्याची अंमलबजावणीस सुरूवात करण्यात आली आहे. भुसावळ विभागाने 454 यंत्रांची मागणी नोंदवली आहे. दरम्यान, सध्या एसटीचे वाहक, पतसंस्थांचे पिग्मी एजंट, रेशनिंग दुकाने अशा ठिकाणी या प्रकारची यंत्रे वापरतात.