धावत्या रेल्वेतून उडी घेतल्याने तरुणाचा मृत्यू

0

जळगाव । मेहरूण परिसरातील इस्टेट ब्रोकरचा मुलगा काही दिवसांपुर्वी ठाणे येथे जमातमध्ये गेला होता. बारावी उत्तीर्ण झाल्याने त्याला अभियांत्रिकीला प्रवेश घ्यायचा होता. त्यासाठी शनिवारी तो चुकून जळगावला न थांबणार्‍या एक्स्प्रेसने ठाणे येथून बसला. शनिवारी दुपारी 3.15 वाजेच्या सुमारास रेल्वे स्थानकावर न थांबल्याने त्याने घाबरून धावत्या गाडीतून प्लॅटफार्मवर उडी मारली. मात्र, ते प्लॅटफॉर्मवर पडताच डोक्याला गंभीर दुखापत होवून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. मेहरूण परिसरातील इस्टेट ब्रोकर जमील खाटीक हे मूळचे धुळे येथील रहिवासी आहेत. ते सात वर्षापुर्वी जळगावात आले. त्यांच्या परिवारात दोन मुले आणि एक मुलगी आहे. त्या पैकी एक शाहजेब (वय 18) हा रमजान महिना असल्याने काही दिवसांपुर्वी ठाणे येथे जमातला गेला होता. त्याने बारावीची परीक्षा दिलेली होती. त्यात काही दिवसांपुर्वीच लागलेल्या निकालात त्याला 70 टक्के गुण मिळाले होते. पुणे येथे अभियांत्रिकीला प्रवेश घेण्यासाठी जायचे होते. त्यामुळे शनिवारी तो रेल्वेने जळगावला येत होता.

अन् रेल्वेतून घेतली उडी : शाहजेब हा ठाणे येथून शनिवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास लोकमान्य टिळक टर्मीनस- गुवाहटी एक्स्प्रेसमध्ये ठाणे येथून बसला. मात्र गुवाहटी एक्स्प्रेस नाशिक, मनमाड नंतर भुसावळ येथे थांबते. याची कल्पना शाहजेबला नव्हती. शनिवारी दुपारी 3.15 वाजेच्या सुमारास रेल्वे जळगाव स्थानकावर थांबत नसल्याचे शाहजेब याला समजले. त्यामुळे घाबरून त्याने जळगाव रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक 3 वरून रेल्वे जात असताना त्याने धावत्या गाडीतूून उडी मारली. त्यामुळे तो प्लॅटफार्मवर जोरात पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

व्हिजीटींग कार्डवरून पटली ओळख… : प्लॅटफार्मवर पडल्याने गंभीर झाल्याने शाहजेब हे बेशुद्ध झाला होता. रेल्वे पोलिसांनी धावत येऊन त्याची बॅग आणि कपडे तपासले. त्याच्या खिशातील सापडलेल्या पाकीटात त्यांना एक व्हिजीटींग कार्ड सापडले. त्याच्यावर असलेल्या मोबाइल क्रमांकावर पोलिसांनी फोन लावला. तो त्याचे वडील जमील खाटीक यांचा होता. पोलिसांनी घटनेची माहिती कुटुंबियांना दिली. कुटुंबियांनी तत्काळ रेल्वेस्थानकावर येऊन शाहजेब याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. तपासणी केल्यानंतर आपतकालीन वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याला मृत घोषीत केले. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रुग्णालयात वाद : मृत शाहजेब याचे वडील जमील खाटीक यांचे म्हणणे होते, की त्याचा दफनविधी मूळगावी धुळे येथे करायचा आहे. तर शाहजेबच्या मामांचे म्हणणे होते, की जळगावातच करावा. कारण गेल्या काही वर्षापासून जमील खाटीक आणि त्यांच्या पत्नीत वाद असल्याने ते दोन्ही वेगळे राहत होते. या कारणामुळे शनिवारी सायंकाळी सिव्हीलमध्ये वाद झाले होते. मात्र काही जणांनी मध्यस्थी केल्याने वादावर पडदा पडला. शाहजेब याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.