भुसावळ- धावत्या रेल्वेतून पडल्याने उत्तरप्रदेशातील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना साकेगाव शिवारातील रेल्वे ट्रॅकवर शनिवारी दुपारी घडली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत तालुका पोलिसांत अपघाताची नोंद सुरु होती. १७३२३ डाऊन हूबळी – वाराणासी साप्ताहिक रेल्वे गाडीतून प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवासी शामनारायण लालमुनी चव्हाण वय २६ रा. कुबदा,सदीयाबाद, गाझीपूर उत्तरप्रदेश हा प्रवासी साकेगाव शिवारातील रेल्वे डाऊन लाईन खांबा क्रमांक ४४०/३/५ दरम्यान धावत्या रेल्वेतून पडला.शनिवारी दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. या घटनेची माहिती तालुका पोलिसांनी सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान मिळाल्यानंतर उपनिरीक्षक सुरेश वैद्य, विजय पोहेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.