नवी दिल्ली । आगामी आशियाई ग्रां. प्री. 2017च्या तीन सत्रांमध्ये सहभागी होण्यासाठी 16 सदस्यांचा भारतीय संघ शनिवारी चीनला रवाना होणार आहे. जियाजिंग आणि जिन्हुआ येथे अनुक्रमे 24 आणि 27 एप्रिलला स्पर्धेचे पहिले व दुसरे सत्र पार पडेल. यानंतर अंतिम सत्र 30 एप्रिलला चिनी तैपई येथे होईल.
भारताची अव्वल धावपटू दुती चंद हिच्या नेतृत्वाखाली हा संघ जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.400 मी. शर्यतीतील राष्ट्रीय विक्रमवीर मोहम्मद अनास आणि इंचिओन आशियाई क्रीडा 2014 क्रीडा स्पर्धेत 400 मी. शर्यतीतील कांस्यपदक विजेती पूवम्मा राजू अंतिम सत्रादरम्यान भारतीय संघात सामील होतील. दुती आणि रीना जॉर्ज महिलांच्या 100 मीटर शर्यतीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील. त्याच वेळी, पुरुषांमध्ये विद्यासागर सिद्धारानयक याच्यावर भारताची मदार असेल.