अहमदाबाद : गुजरातमध्ये राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. येथून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहदेखील निवडणूक लढवत असल्याने भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. त्यातच काँग्रेसच्या आमदारांचे राजीनामा सत्र सुरू झाल्याने काँग्रेसची चिंता वाढली असून, पक्षाला लागलेली गळती रोखण्यासाठी काँग्रेसने 40 आमदारांना रातोरात गुजरातमधून कर्नाटकात हलविले आहे.
बेंगळुरूमधील केम्पेगौडा विमानतळावर काल रात्री काँग्रेसच्या या 40 आमदारांचे आगमन झाले. त्यांना येथील एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले असून, कर्नाटकचे मंत्री डी. के. शिवकुमार आमदारांची बडदास्त ठेवत आहेत. गेल्या 24 तासांत सहा आमदारांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी घोडेबाजार वाढण्याची शक्यता वाढल्याने काँग्रेसने हे पाऊल उचलले आहे.