जळगाव : महिन्याभरापूर्वी मुलीच्या विवाहानंतर जावायाने मुलीला वागविण्यास नकार दिल्याने समाजाच्या नागरिकांच्या मध्यस्थीने झालेल्या बैठकीत नवविवाहितच्या वडीलांनी धास्ती खाल्याने त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी मुलीसह समाजातील नागारिकांचे व नातेवाईकांचे जाबजबाब नोंदविले आहे. दरम्यान शवविच्छेदन अहवालानंतर कारवाई करण्याचे आश्वासन देवून डिवायएसपी सचिन सांगळे यांनी नातेवाईकांची समजूत घातली.
अशी घडली घटना
चाळीसगाव तालुक्यातील धामणगाव येथील रामदास चव्हाण यांची मुलगी रुपाली हिचा 28 रोजी नांद्रा येथील दिपक भिकन वाघ या तरुणाशी विवाह झाला होता. विवाहानंतर दिपक याने नवविवाहितेला वागविण्यास नकार दिल्याने समाजातील मान्यवरांनी बैठक घेतली होती. या बैठकीत दिपक याने रुपाली हिला वागविण्यास नकार देवून फारकती घेवून टाका असे सांगितल्याने नवविवाहिता रुपाली हिचे वडील रामदास चव्हाण यांनी धास्ती खाल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. उपचार सुरु असतांना त्यांचा मृत्यू झाला दरम्यान नातेवाईकांनी दिपक वाघ यांच्यासह कुटुंबियांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हापेठ पोलिसात केली. सकाळपासून नातेवाईक पोलिस स्टेशनच्या आवारात थांबून होते.
नातेवाईकांची पोलिस अधिक्षकांकडे तक्रार
मयत चव्हाण यांच्या नातेवाईकांनी सकाळी पोलिस अधिक्षकांची भेट घेवून घडलेला सर्वप्रकार सांगितला. त्यानंतर डिवायएसपी सचिन सांगळे यांनी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला येवून शवविच्छेदन अहवालानंतर कारवाई करण्याचे आश्वासन नातेवाईकांना दिले. दरम्यान तपासधिकारी सपोनि संदिप आराक यांनी मुलीसह तिची आई, मामा, बहिण व बैठकीत उपस्थितांचे जाबजबाब नोंदविले आहे.