धुम्रवर्ण रथातून निघणार ‘दगडूशेठ’ची सांगता मिरवणूक

0

पुणे । श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (125) वर्षानिमित्त सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक मंगळवारी मोठ्या थाटात काढण्यात येणार आहे. यंदा धुम्रवर्ण रथामध्ये ’दगडूशेठ’चे गणपती बाप्पा विराजमान होणार असून मोतिया रंगांच्या लाखो दिव्यांनी हा रथ उजळून निघणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली.

रथाला कोरीवकाम केलेले पाच कळस
धुम्रवर्ण रथावर 8 खांब असून आकर्षक नक्षीकाम असलेल्या 4 कमानी उभारण्यात आल्या आहेत. रथाचा आकार 15 बाय 15 फूट असून उंची 22 फूट इतकी आहे. रथावर रेखीव रंगीबेरंगी कोरीवकाम असलेले 5 कळस बसविण्यात आले आहेत. संपूर्ण रथावर 36 आकर्षक झुंबर लावण्यात आली असून हे रथाचे वैशिष्ट्य असणार आहे. धूम्रवर्ण रथ शिल्पकार विवेक खटावकर यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आला असून रंगकाम सुनील प्रजापती, लाईटस् वायकर बंधू, मारणे इलेक्ट्रिकल्स यांनी सलग 15 दिवस काम करून रथ तयार केला आहे.

पर्यावरण रक्षणाचा देणार संदेश
शतकोत्तर रौप्यमहोत्सवाच्यानिमित्त मिरवणुकीच्या अग्रभागी पर्यावरण रथ असणार आहे. त्यामध्ये पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारे फलक लावण्यात येणार असून याद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच विनायक देवळणकर यांचा नगारा, दरबार बँड, प्रभात बँड आणि स्वरुपवर्धिनी पथक मिरवणुकीत सहभागी होणार आहे. याशिवाय पुरुष भाविकांसह महिला गणेशभक्त मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी होणार असल्याची माहिती अशोक गोडसे यांनी दिली.