धुरामुळे रस्त्यालगतच्या व्यवसायिकांना त्रास, प्रदूषणात मोठी भर

0

रविवारचा दिवस देहूरोडकरांसाठी ठरला वाहतूक कोंडीचा

उड्डाणपूलाचे काम सुरू असल्याने वाहतुकीला अडथळे

देहूरोड : चाकरमान्यांसाठी आरामाचा दिवस असलेला रविवार देहूरोडकरांसाठी मात्र वाहतुक कोंडीचा ठरला. रविवारी महामार्गावरील वाहतुक तिपटीने वाढल्यामुळे दिवसभर वारंवार वाहतुक कोंडीचे प्रकार सुरू होते. स्थानिक व्यापारी, पादचारी आणि दुचाकीस्वारांना मात्र या कोंडीमुळे नाहक त्रास सहन करावा लागला. दिवसभराच्या या कोंडीमुळे हवेच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात भर पडल्याचा दावा जाणकारांकडून करण्यात आला. रविवारचा दिवस हा चाकरमान्यांचा हक्काचा सुटीचा दिवस. या दिवशी पुणे आणि पिंपरी-चिंचवड या बड्या शहरातील अनेकजण सहकुटूंब किंवा मित्रपरिवारासोबत लोणावळा, खंडाळा या निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जातात. त्यामुळे महामार्गावर अचानक वाहनांची संख्या वाढते. यंदाच्या थंडीच्या हंगामातील पहिलाच रविवार असल्यामुळे ही गर्दी प्रचंड वाढली होती. त्यात शहरातील बँक ऑफ इंडिया चौक ते गुरूद्वारा या भागात सुटीच्या दिवशीही उड्डाणपूलाचे काम सुरू असल्याने वाहतुकीला ठिकठिकाणी अडथळे निर्माण झाले होते.

वाहनांची पुढे जाण्यासाठी स्पर्धा

उड्डाणपूलाखाली सध्या माती उकरून त्याजागी पीसीसी करण्यात येत आहे. यासह क्रेनच्या सहाय्यानेही इथे अनेक कामे सुरू आहेत. या कामासाठी रस्त्याच्या काही भागात बॅरिकेट लावून कृत्रिम अडथळे उभारण्यात आले आहेत. त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला होता. दुचाकी व चारचाकी वाहनांमध्ये मोठ्या वाहनांना ओलांडून पुढे जाण्यासाठी निर्माण झालेली स्पर्धादेखील कोंडीत भर घालताना दिसून आली. सकाळपासून वाहतुकीचा प्रचंड ताण या भागात दिसून आला. दुपारपर्यंत या दोन्ही चौकात एकही वाहतुक पोलीस नव्हता. त्यामुळे महामार्गावरून धावणार्‍या वाहनांना दोन्ही चौकांतून आडव्या जाणार्‍या वाहनांचा अडथळा सातत्याने निर्माण होताना दिसून आला. एकंदरीतच अरूंद रस्त्यावर पुलाचे काम आणि चौकातून आडवी जाणारी वाहने यामुळे वाहतुक कोंडी निर्माण झाली होती. या कोंडीमुळे वाहनांचे कर्कश हॉर्न, धुराचे लोट आणि टायरमुळे रस्त्यावरील धुळीचे उठणारे लोट याचा रस्त्यालगतच्या दुकानदारांना प्रचंड त्रास झाला. रस्त्यालगत काही खाद्यपदार्थांची दुकाने आणि उपहारगृहे आहेत. याठिकाणी या धुराचा आणि धुळीचा परिणाम अधिक जाणवत होता. दिवसभराच्या या कोंडीमुळे हवेच्या प्रदूषणात कमालीची वाढ झाल्याचा दावा माहितगारांकडून करण्यात आला आहे.

ठेकेदाराने काम रात्री करावे

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाकडून देहूरोड येथे गुरूद्वारा ते शस्त्रास्त्र निर्मिती कारखाना प्रवेशद्वार या भागात सुमारे साडेसातशे मीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. पुलाखाली तयार झालेले मातीचे ढिगारे आणि राडारोडा काढण्याचे काम सध्या सुरू आहे. मातीचा थर खोदून त्याजागी सिमेंट आणि वाळूचे मिश्रण टाकण्यात येत आहे. या कामासाठी पुलाखाली बॅरिकेटस् लावण्यात येतात. त्यामुळे मुख्य मार्गावर वाहतुकीचा ताण पडतो. शिवाय अरूंद मार्गामुळे अपघाताचा धोकाही वाढला आहे. त्याचबरोबर खोदकामामुळे उठणारे धुळीचे लोट वाहनचालकांना डोकोदुखी ठरू लागले आहेत. या बाबी विचारात घेऊन संबंधित ठेकेदाराने माती उपसण्याचे काम रात्रीत करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.