पिंपरी – खडकी कँन्टोमेंट बोर्डाच्या वल्लभनगर येथील कचरा डेपोला आग लागून सात दिवस उलटले. त्यातून निघणार्या धुरामुळे श्वास गुदमरणे, डोळे चुरचरणे, लाल होणे, व्हायरल फीव्हर असे विकार नागरिकांना होत आहेत. त्यामुळे परिसरातील दवाखान्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पुणे-मुंबई व पुणे-नाशिक महामार्गालगत वल्लभनगर येथे 22 एकर जागेवर खडकी कँन्टोमेंट बोर्डाचा कचरा डेपो आहे. त्याला गुरुवारी आग लागली होती. त्यावर पाण्याचा मारा केला जात आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याने त्याचा त्रास परिसरातील नागरिकांना होत आहे. अनेकांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने वैद्यकीय उपचार घ्यावे लागत आहेत.