धुळवडीच्या सप्तरंगात न्हाली तरूणाई

0

हो ली खेले रुघुबिरा…‘, तुने मारी पिचकारी…‘, लुंगी डान्स…झिंगाट ‘ अशा विविध गाण्यांच्या संगीतावर सप्तरंगांची उधळण शहरातील तरुणाई सोमवारी रंगांत अक्षरशः न्हाऊन निघाली. धुळवड साजरी करताना महाविद्यालय व शाळा परिसरात मुला-मुलीचे वसतिगृह तसेच शहरात विविध ठिकाणी युवाशक्तीने एकत्रित येऊन जल्लोष केला. यात बालगोपालांसह ज्येष्ठांनीही धमाल केली. धुलिवंदन असल्याने सोमवारी सकाळपासूनच शहरात उत्साहाचे वातावरण होते. रंगोत्सवाचा आनंद घेण्यासाठी रविवारी केलेल्या आयोजनाप्रमाणे अगदी सकाळपासूनच युवकांच्या रंगपंचमीला सुरवात झाली होती. शहरातील गल्ली, वस्त्यांमध्ये सामूहिक धुलिवंदनाचा आनंद घेतला गेला. तरुणींसाठी काही भागात स्वतंत्र उत्सव साजरा झाला. डीजेच्या तालावर थिरकणार्‍या तरुणाईने सप्तरंगांची उधळण करीत रंगोत्सवाला बहर आणला. रंगोत्सवात बेभान होत गल्ली-गल्लीतून सुसाट मोटारसायकलवर तरुणांचे समुहच्या समुह आरोड्या मारत फिरताना दिसत होते. शाळकरी मुलेही रंगोत्सवाच्या धुंदीत गल्यांमधून सकाळपासूनच दंग दिसत होते. तर रात्री उशिरापर्यंत तरूणांनी मित्रांना रंग लावण्यासाठी धावपळ सुरू असल्याचेही पहायला मिळाले.

डिजेच्या तालावर तरूणाईची धम्माल
लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या अशा विविध रंगांनी माखलेले कपडे व चेहरे… चौकाचौकांत रस्त्यावर रंगांचा शिडकावा… धुडवळ असल्याने शहरातील चौकाचौकांमध्ये रस्त्यांवर दिसत होते. चौकांमध्ये रंगोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रंग उधळण्यासोबत नाचण्याचा आनंद घेण्यासाठी अनेक ठिकाणी डि.जे. लावण्यात आले होते. हिंदी, मराठी अशा रिमिक्स गाण्यांवर नाचण्याचा आंनद दिवसभर घेतला. तसेच बुरा न मानो होली है…’ असे म्हणत येणार्‍या-जाणार्‍यांना देखील रंगाने भरविले जात होते. शिवाय, महिला व युवतींसाठी नुतन मराठा महाविद्यालयात स्वतंत्र कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याठिकाणी युवतींनी अगदी डिजेच्या तालावर नाचत धम्माल उडविली.

पर्यावरण पुरक रंगपंचमीवर भर
पाणी टंचाईचा प्रश्‍न उन्हाळ्यात निर्माण होत असल्याने पाण्याची नासाडी टाळण्याचा एक प्रयत्न अनेक ठिकाणी झाल्याचा पाहण्यास मिळाले. पर्यावरणपुरक रंगपंचमी साजरी करण्यावर अनेकांनी भर दिला. पाण्याची टंचाई असल्याने धूळवडीत पाणी न वापरता कोरड्या नैसर्गिक रंगाची वापर करत रंगपंचमी खेळण्यावर अधिक भर होता. मात्र, नेहरू चौक मित्र मंडळ, गणेश कॉलनी चौकात आयोजित धुलिवंदन कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर झाल्याचे पाहण्यास मिळाले. शिवाय कॉलन्यांमध्ये आणि लहान मुलांची धूलिवंदनांचा आनंद पाण्याचा वापर करून घेतला.

सप्तरंगांची उधळण करत मूळजी जेठा महाविद्यालय परिसर गजबजला होता. मुलींच्या वसतिगृहात सप्तसुरांच्या तालावर मुक्तपणे रंगाची उधळण सुरू होती. कॉलेज परिसरात चौका-चौकात ढोल ताशांच्या गजरात धुळवडीत तरुण-तरुणी बेभान झाले होते.