तळोदा । राजकारणात कधी कोणत्या गोष्टीला महत्व येईल याचा काही नेम नसतो.त्याचाच प्रत्यय तळोदा शहरातील नागरिक गेल्या पंधरा दिवसापासून घेत आहेत.तळोदा शहरातील राजकारणात सध्या धुळीला खूप महत्व आले असून धुळीचा मुद्दा हा कळीचा मुद्दा बनला असल्याचे चित्र आहे. शहरात पसरणार्या धुळीने शहराचे राजकारणही चांगलेच तापविले आहे.या वर्षाअखेर होणारी तळोदा नगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन मागील सहा महिन्यांपासून सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधी व प्रशासनाने शहरात विकासकामांचा धडाका लावला आहे. त्यात भूमिगत गटारी बांधकाम, रस्ते कोंक्रेटिकरण आदी कामे केले जात आहेत.परंतु शहरात मेन रोड परिसरात सुरु असणार्या भूमिगत गटारीचे काम हे शहरवासियासाठी आगळेवेगळे व विरोधकांसाठी महत्वाचे ठरले आहे.भूमिगत गटारीच्या या कामामुळे शहरवासीयांची गैरसोय टाळली जाणार असली तरी कामामुळे निर्माण झालेल्या धुळीच्या समस्येमुळे विरोधकांना आयते कोलीत मिळवून दिले आहे.
समस्या आरोग्यासाठी हानिकारक: धुळीचा हि समस्या आरोग्यासाठी कशी हानिकारक असून नगरपालिका प्रशासनाच्या नियोजनशून्य कामाद्वारे निर्माण झाली आहे,हे शहरवासीयांना पटवून देण्यासाठी शहराचा मुख्य वर्दळीचा समजल्या जाणार्या स्मारक चौकात शहर शिवसेनेने मोठे पोस्टर लावले आहे.शिवसेनेच्या या पोस्टर ने सध्या शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले आहे.यासोबत शिवसेनेच्या वतीने शहरातील नागरिकांना धुळीच्या समस्येपासून बचाव व्हावा यासाठी शहरात विविध भागात टँकरव्दारे रस्त्यांवर पाणी मारण्यात येत आहे व त्यातून नगरपालिकेचा निषेध त्यातून व्यक्त करण्यात येत आहे.पाणी मारण्यासाठी वापरण्यात येणार्या ट्रँकरवरदेखील शिवसेनेने तशा आशयाचे बॅनर लावले आहे.यातून शहरवासीयांच्या मूलभूत प्रश्नबाबत शिवसेना आक्रमक असल्याचा संदेश नक्की शहरवासीयांपर्यंत पोहचविण्यात शिवसेना यशस्वी झाल्याचे दिसते.नागरिकांमध्ये आता तशी चर्चा देखील रंगू लागली आहे.आगामी नगरपालिकेची निवडणूक लक्षात घेता शिवसेना या समस्येच्या माध्यमातून शहारातील राजकारणात पुन्हा जोमने सक्रिय झाली आहे.
दुचाकीस्वारांना मोठ्या प्रमाणात त्रासाचा सामना
तळोदा शहरातील मेन रोड परिसरातील स्मारक चौक ते दत्त मंदिरपर्यतचा भाग हा मुख्य बाजारपेठेचा भाग आहे.शहरातील दवाखाने,मेडिकल,सराफा बाजार,कापड दुकाने, भांड्याची दुकानासह मुख्य बाजारपेठ हि याच परिसरात वसलेली आहे.महत्ववाचे म्हणजे नगरपालिकेची प्रशासकीय इमारत हि स्मारक चौक जवळ मेन रोडला लागून आहे.याच परिसरात गटारींचे काम सुरु असून त्यातून मोठ्या प्रमाणात धूळ निर्माण होत असते.या धुळीचा बाजारपेठेत विविध कामासाठी येणार्या नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळते.त्याचप्रमाणे या परिसरातील दुकानदार, व्यावसायिक व रहिवासी नागरिकही या धुळीने जाणार्या त्रासाने मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. पादचारी व दुचाकीस्वारांना धुळीचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो.चारचाकी वाहन रस्त्यावर पडलेल्या मातीवरून गेल्यावर खूप मोठया धूळ निर्माण होते. त्यामुळे चारचाकी वाहनांच्या मागे चालणार्या वाहनधारक व पादचारी तर धुळीने पूर्णपणे माखतात,असा अनुभव आहे. धुळीपासून बचावासाठी तोंडाला रुमाल बांधणे व डोळ्यावर चष्मा घातल्याशिवाय रस्त्यावर मार्गक्रमण करूच शकत नाही अशी परिस्थिती आहे. यासंदर्भात काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या पुढाकाराने नागरिक, दुकानदार व व्यावसायिकांनी नगरपालिका प्रशासनाला धुळीवर नियंत्रणासाठी उपाययोजना राबविण्याची विनंती करणारे निवेदन दिले.त्यावर नगरपालिकेने तात्काळ कार्यवाही करत शहरातील मुख्य धुळीची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवणार्या बाजारपेठतील भागात टँकरच्या सहायाने पाणी मारून धूळ नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.पण पाहिजे त्या प्रमाणात या प्रयत्नांना यश आलेले दिसत नाही.
आक्रमकपणे आंदोलनाचा पवित्रा
धुळीच्या या समस्येने गटबाजीत विखुरलेल्या शहर शिवसेनेमध्ये नव्याने प्राण फुंकल्याचे दिसून येते. या प्रश्नावर शिवसेना स्टाईलने आक्रमकपणे व्यक्त झाल्याने शहरातील शिवसैनिकामध्ये उत्साह संचारला आहे.हा उत्साह वर्षाअखेरीस होणार्या नगरपालिका निवडणुकींपर्यंत टिकवून ठेवण्याचे खरे आव्हान आता शहरातील शिवसेना नेत्यांपुढे आहे. जिल्ह्यातील पहिली नगरपालिका असणार्या तळोदा शहर नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक हि नियोजनानुसार डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. निवडणुकीला अजून सात-आठ महिन्याचा अवधी असला तरी धुळीच्या या समस्येने शहरातील राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. यावेळी नगराध्यक्ष हा थेट जनतेतून निवडला जाणार असल्याने सर्व राजकीय पक्षांनी आतापासून आपआपल्या मोर्चेबंधानीला सुरुवात केली आहे.मात्र धुळीच्या या समस्येवर आक्रमकपणे आंदोलनाचा पवित्रा घेऊन शिवसेनेने उघडपणे आघाडी घेतली असल्याचे दिसून येते.