धुळेकरांची मनस्थिती ढासळली

0

धुळे । रफियोद्दीन शेख ऊर्फ गुडडयाची टोळी युध्दातून झालेल्या हत्येनंतर धुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. सर्वसामान्य माणूस व शहरातील व्यावसायिक वर्ग भयभीत झाला आहे. या प्रकरणातून काही समाजविघातक मंडळी जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असून धुळे शहरात प्रस्थापित झालेला जातीय सलोखा बिघडविण्याचे काम करीत आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रामकुमार यांनी तात्काळ सर्वपक्षीय व सर्वधर्मीय नेते व कार्यकत्यारसह शांतता समितीची बैठक बोलवावी,असे विनंतीपत्र सामाजिक कार्यकर्ते व माजी आमदार प्रा.शरद पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक रामकुमार यांना दिले आहे.

छोटे-मोठे व्यावसायिक हादरले
धुळ्यात मंगळवार,दि.18 जुलै रोजी सकाळी दोन गुंड टोळ्यांच्या व्यावसायिक संघर्षातून धुळ्याच्या भरव्यापारी पेठेत अमानवी असे हत्याकांड घडले आहे. या हत्याकांडाच्या व्हिडीओ क्लीप व्हायरल झाल्याने सर्वसामान्य माणूस भयभीत झाला आहे. यातून काही समाजकंटक हिंदू-मुस्लीम बांधवांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे दोन्ही समाजातील छोटे-मोठे व्यावसायिक हातगाडीवाले, पाथरीवाले, भाजीविक्रेते, भंगार गोळा करणारे व बांधकाम मजूर भयभीत झाले असून याचा परिणाम कामधंद्यांवर झाला आहे.

विद्यार्थी व पालकांमध्ये ताणतणावाचे वातावरण
काही परिसरातील शाळा,महाविद्यालये, खासगी क्लासेसमध्ये जाणार्‍या विद्यार्थी व पालकांमध्ये तणावमय वातावरण आहे.बाजार व्यवसायासाठी बाहेर पडणारी गर्दी कमी झाली आहे. यामुळे शहराच्या उद्योगधंदा व आर्थिक व्यवहारांवर परिणाम झाला आहे. वरील परिस्थिती लक्षात घेता, धुळे शहराचा नव्याने रुपाला आलेला चांगला लौकिक बिघडू नये, यासाठी समाजघटकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. सदर घटनेबाबत पोलीस यंत्रणा दक्ष असून गुन्हेगारांचा शोध घेणे सुरु आहे.

शांतता प्रस्थापित करणे आवश्यक
मात्र या प्रकरणातून कुठलेही बरे-वाईट होऊ नये, यासाठी पोलीसांनी पुढाकार घेऊन सर्वपक्षीय व सर्वसमाज कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन शांतता प्रस्थापित करणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ शांतता समितीची बैठक बोलवावी आणि निर्भयपणे सगळ्यांना वावरण्याचा संदेश द्यावा, अशी विनंतीपत्र माजी आमदार प्रा.शरद पाटील यांनी आज (दि.22) जिल्हा पोलीस अधीक्षक एम.रामकुमार यांना दिले आहे. श्री.रामकुमार यांच्यावतीने गृहविभागाचे उपविभागीय अधिकारी श्री.गवळी यांनी निवेदन स्विकारले आहे.