महिनाभर प्रवाशांची गैरसोय ; रेल्वेच्या इंजिनिअरींग विभागातर्फे विविध तांत्रिक कामे होणार
भुसावळ- धुळे ते चाळीसगाव दरम्यान धावणारी पॅसेंजर क्रमांक 51114 व चाळीसगाव-धुळे धावणारी पॅसेंजर क्रमांक 51115 रेल्वेच्या तांत्रिक कामांसाठी 24 जानेवारी ते 24 फेब्रुवारीदरम्यान रद्द करण्यात आली आहे. महिनाभर पॅसेंजर रद्द करण्यात आल्याने धुळ्यासह चाळीसगावातील रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. धुळे ते चाळीसगाव दरम्यान दररोज सकाळी 11.40 वाजता सुटणार्या पॅसेंजरची (51114) तसेच चाळीसगाव-धुळे दरम्यान धावणार्या पॅसेंजरची (51115) एक फेरी 24 जानेवारी ते 24 फेब्रुवारीदरम्यान रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. धुळे-चाळीसगाव रेल्वे मार्गावर रेल्वेच्या इंजिनिअरींग विभागातर्फे तांत्रिक कामांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. धुळे येथून सकाळी दररोज 11.40 वाजता 51114 सुटणारी धुळे-चाळीसगाव पॅसेंजर दुपारी 12.55 वाजता चाळीसगाव पोहोचते तर पुन्हा परतीच्या प्रवासात हीच गाडी 51115 दुपारी 1.40 वाजता चाळीसगाव-येथून धुळ्यासाठी सुटते. गाडी रद्दच्या निर्णयाबाबत रेल्वे प्रवाशांनी बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन मध्य रेल्वेच्या भुसावळ रेल्वे प्रशासनाने केले आहे.