धुळे। कृ षी विभागामार्फत शेती विकासाच्या विविध योजना राबविल्या जातात. जिल्ह्यातील शेतकर्यांना कर्जमुक्तीसाठी शेतकर्यास सक्षम करणे तसेच सन 2022 पर्यंत शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. या उद्दिष्ट पूर्तीसाठी चालूवर्षी खरीप व रब्बी हंगामात उन्नत शेती व समृध्द शेतकरी ही मोहीम राबविण्यात यावी, अशी माहिती विभागीय कृषी सहसंचालक डॉ. कैलास मोते यांनी दिली. कृषी चिकित्सालय, पिंप्री, ता. धुळे येथे आयोजित खरीप हंगाम पूर्व जिल्हास्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते.
भाजीपाला उत्पादन वाढीचे तंत्र
बी. डी. जडे यांनी ठिबक सिंचनावरील कापूस पिकाची लागवड व फर्टीगेशनची माहिती दिली. प्रा. डॉ. श्रीधर देसले यांनी माती परीक्षणावर आधारीत सेंद्रीय व रासायनिक खत व्यवस्थापनाची माहिती दिली. तसेच भाजीपाला पीक उत्पादन वाढीची सूत्रे नमूद केली. प्रा. जगदीश काथेपुरी यांनी कापूस, सोयाबीन, तूर, मुग, उडीद पिकांच्या उत्पादन वाढीच्या सूत्रांची माहिती दिली. कार्यशाळेचे संयोजन कृषी उपसंचालक बी. के. वारघडे यांच्या मार्गदर्शनाखाली विनय बोरसे, के. पी. देवरे, अमृत पवार, सुरेश आपस्वार, प्रवीण रनाळकर, लक्ष्मीकांत बडगुजर, सागर सावंत, यशवंत चव्हाण यांनी केले. आभार तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे यांनी मानले.
यांची होती उपस्थिती
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे, जैन इरिगेशनचे डॉ. बी. डी.जडे, विभागीय विस्तार केंद्राचे प्रा. डॉ. श्रीधर देसले, कृषी विज्ञान केंद्राचे प्रा. डॉ. पंकज पाटील, प्रा. डॉ. विपुल वसावे, प्रा. डॉ. जगदीश काथेपुरी, कृषी महाविद्यालय दोंडाईचा येथील प्रा. सुभाष नांद्रे, कृषी उपसंचालक बी. के. वारघडे, मृद चाचणी प्रयोग शाळेचे सी. बी.पाटील व सर्व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते. उन्नत शेती व समृध्द शेतकरी या मोहिमेंतर्गत तालुका हा कृषी विकास व उत्पादन वाढीसाठी नियोजनाचा घटक असणार आहे.
शेतकर्यांचे संघटन करणार
शेतकर्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने पिकांची उत्पादकता त्यांच्या अनुवंशिक उत्पादन क्षमतेपर्यंत वाढविण्याचा प्रयत्न करणे, पिकांचे वैविध्यीकरण करणे, पिकाचा उत्पादन खर्च कमी करणे, शेतमालाच्या बाजार भावातील नियमित चढउतार लक्षात घेऊन शेतमाल विक्रीचे तंत्र शेतकर्यांना अवगत करून देणे, शेतीपूरक व्यवसायांना चालना देणे, बाजारपेठ आधारीत कृषी उत्पादनाबाबत निर्णय घेण्याच्या दृष्टिने राज्यातील शेतकर्यांच्या उत्पादन कंपन्यांद्वारे शेतकर्यांचे संघटन करणे व शेतकर्यांच्या या कंपन्यांची व्यावसायीक क्षमता बांधणी करणे, काढणी पश्चात शेतमाल हाताळणी व मूल्यवर्धन करण्यासह आधुनिक कृषी तंत्रज्ञान जिल्ह्यातील सर्व शेतकर्यांपर्यंत पोहचविणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे यांनी सांगितले.