धुळे जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त 14 शेतकरी कुटुंबांना मिळणार मदत

0

धुळे । शेतकरी आत्महत्या निर्मूलन व सहाय्यता समितीच्या झालेल्या बैठकीत 14 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज सकाळी शेतकरी आत्महत्या निर्मूलन व सहाय्यता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या कृषी समितीच्या सभापती लीलावती बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ (धुळे), नितीन गावंडे (शिरपूर), तहसीलदार दत्ता शेजूळ (महसूल), अमोल मोरे (धुळे ग्रामीण), संदीप भोसले (साक्री), रोहिदास वारुळे (शिंदखेडा), ज्योती देवरे (धुळे शहर), अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रदीप गिलाणकर उपस्थित होते.

महिला सल्लागार समितीची बैठक
जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात सकाळी सर्वसमावेशक महिला जिल्हा सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी न्या. विवेक गव्हाणे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय शिंदे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत, परीविक्षा अधिकारी एम. एम. बागूल, प्रा. उषा साळुंखे, प्रा. फरीदा खान, शोभा जाधव, मीना भोसले, दीना चौक, मीना सातभाई, जयश्री शहा उपस्थित होते. यावेळी डॉ. सोनगत यांनी महिलांसाठी वैयक्तिक व सामूहिक तसेच निवासी कार्यरत असणार्‍या जिल्हास्तरावरील सर्व विभागांच्या राज्य व केंद्र पुरस्कृत योजना, तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या नियोजनाची सविस्तर माहिती दिली. त्यात नोकरी करणार्‍या महिलांचे वसतिगृह, शुभमंगल सामूहिक विवाह योजना, हुंडा पध्दतीच्या विरोधात जनजागृती व साहाय्य संबंधाने करण्यात आलेली कार्यवाही, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियमाबाबतची कार्यवाही, महिला धोरण आदींचा समावेश होता. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ. सोनगत यांनी प्रास्ताविक, सूत्रसंचालन करुन उपस्थितांचे आभार मानले.

बैठकीत एकूण 15 प्रस्ताव ः शेतकरी आत्महत्या निर्मूलन व सहाय्यता समितीच्या बैठकीत एकूण 15 प्रस्ताव मांडण्यात आले होते. त्यात धुळे तालुक्यातील 6, साक्री तालुक्यातील 5, तर शिंदखेडा तालुक्यातील 4 प्रस्तावांचा समावेश होता. त्यापैकी एक प्रस्ताव अपात्र ठरला. फेरचौकशीसाठी पाठविलेल्या प्रस्तावांची चौकशी करुन ते पुढील बैठकीत सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांनी यावेळी दिले.