धुळे जिल्ह्यात अवैध दारूचा महापूर!

0

11 महिन्यात 728 गुन्हे नोंदविले, 241 जणांना अटक, 2 कोटींपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त
विधानसभेत लेखी प्रश्नाच्या उत्तरात उत्पादन शुल्क मंत्र्यांची माहिती

मुंबई (निलेश झालटे) :- धुळे जिल्ह्यात गेल्या 11 महिन्यांमध्ये अवैध दारूचा महापूर आला असल्याची माहिती खुद्द राज्य उत्पादन शुल्क मंत्र्यांच्या लेखी उत्तरातून मिळाली आहे. एप्रिल 2017 ते जानेवारी 2018 या कालावधीत 728 गुन्हे नोंदविले असून 241 लोकांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल 2 कोटी 3 लाख 99 हजार 424 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. अवैध दारूच्या या धंद्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई केली जात असून टोल फ्री नंबर व व्हाट्स अप क्रमांक तक्रारींसाठी दिला आहे. तसेच ग्रामरक्षक दलाच्या माध्यमातून अवैध मद्य निर्मिती व विक्रीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे. साक्रीचे आमदार डी. एस. अहिरे यांनी शिरपूर, जि. धुळे तालुक्यात अवैध दारू पकडण्यात आल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

शिरपूर तालुक्यातील अवैध दारूसाठ्यांवर केलेल्या कारवाईतील या प्रकरणाची शासनाने चौकशी करून कारवाईबाबत तसेच दारू विक्री करणाऱ्यांवर आणि अवैध दारू विक्री थांबविण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केलीय? असा प्रश्न अहिरे यांनी केला. त्यावर मंत्री बावनकुळे यांनी उपर्युक्त आकडेवारी देऊन धुळे जिल्ह्यातील अवैध दारूचा महापूर होत असल्याच्या बाबीला दुजोराच दिला आहे.

मंत्री बावनकुळे यांनी म्हटले आहार की, अवैध मद्य निर्मिती व विक्रीच्या धंद्याची माहिती काढून कारवाई करण्यात येते. त्याकरिता सामूहिक धाडसत्र आयोजित करणे, गस्त घालणे, टोलनाक्यावर तसेच अचानक संशयित वाहने तपासणे इत्यादी कामकाज केले जाते. मुंबई दारूबंदी अधिनियम अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई देखील केली जात असल्याचे सांगत याबाबत तक्रारींसाठी टोल फ्री नंबर आणि व्हाट्स अप नंबर देखील प्रसिद्ध केला असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले आहे. स्थानिक ग्रामरक्षक दलाच्या माध्यमातून अवैध मद्य निर्मिती व विक्रीच्या धंद्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले आहे.