धुळे जिल्ह्यात कानूबाईचे भावपूर्ण विसर्जन

0

शिंदखेडा । शिंदखेडा शहर व तालूक्यात खांन्देशचे दैवत असलेल्या कानुबाई मातेच्या उत्सवाची आज सांगता झाली असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. ढोलताश्यांच्या गजरात कानुबाई मातेचे विर्सजन करण्यात आले. जुलै महिन्याच्या अखेरच्या दोन दिवसात समाधानकारक पाऊस झाल्याने कानुबाई मातेच्या उत्सवासाठी सर्वजण सज्ज झाले होते. गावा गावामध्ये कानुबाई मातेचा उत्सव साजरा करण्यासाठी धावपळ सुरू होती. दूरदेशी असलेले आप्तेष्ट बाळगोपाळांसह आपल्या मूळगावी असलेल्या घराकडे आलेले होते. वरखेडे गावात किमान आठ ठिकाणी कानूबाई मातेची मनोभावे स्थापना करण्यात आलेली होती.याच दिवशी सायंकाळी घरोघरी रोटांचा देखील कार्यक्रम करुन कानुबाईला स्थापनेनंतर नैवेद्य दिले जाते. कानूबाई मातेच्या ठिकाणी रात्रभर जागरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता सोमवारी स्थापना केलेल्या सर्वच कानुबाई मातेची मिरवणूक गावातून एकत्र काढून भव्य मिरणूक काढण्यात आली. दरम्यान कानबाईच्या मिरवणूकीत डीजेच्या तालावर नाचत असतांना एका मुलाला विजेचा शॉक लागून मृत्यू झाला तर शिंदखेडा तालुक्यातील मुडावद येथे कानबाई मातेचे विसर्जन करायला गेलेले चार तरूण तापी पात्रात पडल्यानंतर त्यांना वाचविण्यात यश आले.

कानुबाईच्या घरात रात्रभर जागरण
रविवारी कानुमातेची आप्तेष्ट व नातेवाईक यांच्या उपस्थितीत मातेची विधीवत पूजा करून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. आकर्षक विद्यूत रोषणाई करून उत्सवानिमीत्त जागरण केले. रात्रभर मातेचा गोडवा गाणारी गाणी म्हटली गेली. काहि ठिकाणी भजनी मंडळाला आमंत्रित करण्यात आले होते. गावातील ग्रामस्थांनी आपल्या कुटूंबासमवेत कानबाई मातेचे दर्शन भक्तिभावाने घेतले. घरामध्ये रात्रभर उत्साहाचे वातावरण होते. श्रावणाच्या दुसर्‍या सोमवारी काल सकाळी ढोलताशांच्या गजरात विर्सजन मिरवणूक काढण्यात आली.शहरामध्ये कॉलनी परीसर, विरदेल रोड, गांधी चौक, माळीवाडा अश्या विवीध भागातील कानबाईच्या विर्सजन मिरवणूकीला सकाळी नऊ वाजेनंतर सुरूवात झाली. ढोलताश्यांच्या गजरात मिरवणूक सुरू झाली.विवीध भागातील कानबाई मातेच्या मूर्ती शिवाजी व गांधी चौकात एकत्र त्याठिकाणी मातेची गळा भेट करण्यात आली. हि मिरवणूक दोन तासापेक्षा अधिक काळ सुरू होती. शहराच्या विवीध भागातून कानबाई मातेच्या मिरवणूका बूराई नदिकाठी आणण्यात आल्या. जोरदार पाऊस नसल्याने नदिचे पात्र कोरडेच आहे. त्या ठिकाणी नगरपंचायत आणि सर्वच राजकिय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पाण्याचे ड्रम भरून विर्सजनासाठी पाण्याची व्यवस्था केली होती. पोलिसांच्या बंदोबस्तात विर्सजन मिरवणूक शांततेत पार पडली.

वरखेडेत कानूबाईचे विसर्जन
वरखेडे । धुळे तालुक्यातील वरखेडे गावात आदीशक्ती कानुबाई मातेचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विखुरलेल्या परीवार एकत्र आणण्याचा कानुबाई मातेच्या सणाला आदराचे स्थान देण्यात आले. या सणानिमित्त रोट खाण्यासाठी दुर गेलेला परीवारातील सदस्य दोन दिवस का होईना मोठ्या प्रेमाण घरी येतात. नागपंचमीच्या पहिल्या रविवारी कानुबाईची संपुर्ण खान्देशात स्थापना केली जाते. वरखेडे गावात किमान आठ ठिकाणी कानूबाई मातेची मनोभावे स्थापना करण्यात आलेली होती. कानूबाई मातेच्या ठिकाणी रात्रभर जागरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता सोमवारी स्थापना केलेल्या सर्वच कानुबाई मातेची मिरवणूक गावातून एकत्र काढून भव्य मिरणूक काढण्यात आली. त्यानंतर मातेला पांझरा नदीच्या पात्रात विसर्जन करण्यात आले.