धुळे । जिल्ह्यातील शिरपूर, शिंदखेडा अर्धा तालुका व साक्री तालुक्याचा पश्चिम पट्टा वगळता धुळे जिल्ह्यात भीषण कोरड्या दूष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. नदी,नाले, मध्यम प्रकल्प व विहीरी अद्यापही कोरड्याच आहेत. धुळे तालुक्यातील चार महसूली मंडळ वगळता कोरड्या दुष्काळाचे संकट आहे. शिरुड बोरी परिसरातील आर्वीपासून ते निमगूळपर्यंतची सर्व गावे पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. जवळपास 70 टक्केपावसाचे दिवस संपत आल्याने अशा वेळेस जिल्हा प्रशासनाने महसूल व कृषी यंत्रणेव्दारा पाहणी करुन शासनाला वस्तुनिष्ठ प्राथमिक अहवाल सादर करावा, अशी मागणी धुळे ग्रामीणचे माजी आ.प्रा.शरद पाटील यांनी पत्रकाव्दारे केली आहे.
प्रकल्प आजही कोरडेच
पावसाने आजपावेतोअंतर दिल्याने शेतकर्यांना काही ठिकाणी दुबार तर काही ठिकाणी तिबार पेरणी करावी लागली. विशेषत: 70 टक्क्यांपेक्षा जास्त धुळे तालुक्यात कोरडा दुष्काळ असून साक्री तालुक्याचा पश्चिम भाग वगळता व शिंदखेडा तालुक्याचा पश्चिम भाग वगळता साक्री व शिंदखेड्यातही 50 टक्के तालुका दुष्काळी परिस्थिती आहे. दर 2-3 वर्षांआड धुळे जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे संकट कायम असते. शेती व पिण्याच्या पाण्यासाठी असणारे सर्व मध्यम व लघु प्रकल्प कोरडेच आहेत. अक्कलपाडा प्रकल्प, बुराई प्रकल्प, वाडी शेवाडी प्रकल्प, अमरावती बॅरेज,हारण्यामाळ प्रकल्प, डेडरगांव धरण, पुरमेपाडा मध्यम प्रकल्प, नकाणे तलाव, रनमाळा धरण, राक्षी धरण, कानोली धरण, मुकटी धरण, जांमफळ धरण, डोंगरगांव धरण, कोठरे धरण तसेच पांझरा नदी, बोरी नदी, कानोली नदी,कोदी नदी, कन्हेर नदी, भात नदी अद्यापही कोरडी आहे. छोट्या नाल्यांमध्ये पाणी नाही, अशी व्यथा पाटील यांनी मांडली आहे.