धुळे । राज्यात 50 कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत 2017 मध्ये चार कोटी रोपांची लागवड होणार आहे. या कार्यक्रमांतर्गत धुळे जिल्ह्यात 1 ते 7 जुलै या कालावधीत 8.2 लक्ष रोपांच्या लागवडीचे उद्दीष्ट आहे. या मोहिमेचे उद्घाटन शनिवार 1 जुलै रोजी सकाळी 9.30 वाजता लळिंग, ता. धुळे येथे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे, असे उपवनसंरक्षक जी. के. अनारसे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. जिल्ह्यात वनविभागाच्या 33 रोपवाटिका असून त्यात 62.58 लक्ष रोपे तयार करण्यात आले आहेत.
रोपे आपल्या दारी : रोपे लागवडीसाठी धुळे जिल्ह्यात 8.2 लक्ष एवढे उद्दीष्ट असले, तरी प्रत्यक्षात 14.54 लक्ष खड्डे खोदण्याचे काम पूर्ण झाले आहे. नागरी वस्ती असलेल्या परिसरात सुध्दा वृक्ष लागवड करण्यासाठी वनविभागाकडून ‘रोपे आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध करुन देण्यासाठी धुळे, शिरपूर, शिंदखेडा, दोंडाईचा, साक्री येथे वन महोत्सव केंद्र सुरू करण्यात आले आहे. या 9 केंद्रातून रोपे विक्री सुरू आहे. संगणक प्रणालीत रोपवन स्थळांची माहिती अद्ययावत करण्याचे काम पूर्ण झाले आहे. ग्रीन आर्मी या पोर्टलद्वारे धुळे जिल्ह्यात 31159 एवढी सभासद नोंदणी झाली आहे.
समन्वय पुस्तिका तयार
उपवनसंरक्षक श्री. अनारसे यांनी म्हटले आहे, या कार्यक्रमास पालकमंत्री दादा भुसे, आमदार अनिल गोटे, आमदार कुणाल पाटील, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे आदी उपस्थित राहतील. वृक्ष लागवडीसाठी 3077 स्थळ निश्चित करण्यात आलेले आहेत. यासाठी लॅण्ड बँक बुकलेट तयार करण्यात आलेले आहे.