धुळे : भारत निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस 25 जानेवारी 1950 असून, हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. राष्ट्रीय मतदार दिवसाचा धुळे जिल्ह्याचा मुख्य कार्यक्रम बुधवार 25 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात होणार आहे, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी जे. आर. वळवी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे. जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमात तृतीयपंथी नव मतदारांना निवडणूक ओळखपत्र वितरण, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र वितरण करण्यात येईल.
यादीच्या अद्यावतीकरणाची मोहीम
संपुर्ण भारत देशात 2016 मध्ये मतदार नोंदणी आणि मतदार यादीच्या अद्यावतीकरणाची मोहीम घेण्यात आली. वर्षभरातील निरंतर प्रक्रिया अंतर्गत आणि 16 सप्टेंबर ते 21 ऑक्टोबर 2016 या कालावधीतील विशेष संक्षिप्त पुनरिक्षण मोहिमेंतर्गत मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात आली. धुळे जिल्ह्यात निरंतर प्रक्रियेत आणि विशेष मोहिमे दरम्यान एकूण 18,764 मतदारांची नोंदणी करण्यात आली. यामध्ये 10077 पुरुष मतदार तर 8678 स्त्री मतदार आणि तृतीयपंथी 9 मतदारांनी मतदार नोंदणी केली आहे. या 18,764 मतदारांपैकी माहे ऑक्टोबर 2016 मध्ये ज्या 10,827 नवमतदारांनी मतदार नोंदणी केली आहे. अशा मतदारांची ओळखपत्रे प्राप्त झाली आहेत. ओळखपत्रांचे वाटप जिल्ह्यातील मतदान केंद्रावर होत आहे.
मतदारसंघनिहाय नवीन मतदारांची संख्या
: 5-साक्री विधानसभा मतदारसंघ (नवीन मतदार संख्या) पुरुष- 1111, महिला- 1072, 6-धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ (नवीन मतदार संख्या) पुरुष- 1290, महिला- 906, 7- धुळे शहर विधानसभा मतदारसंघ (नवीन मतदार संख्या) पुरुष- 1242, महिला- 1020, तृतीयपंथी-09, 8- शिंदखेडा विधानसभा मतदारसंघ (नवीन मतदार संख्या) पुरुष- 634, महिला- 569, 9-शिरपूर विधानसभा मतदारसंघ (नवीन मतदार संख्या) पुरुष- 1692, महिला- 1292. एकूण मतदार संख्या 10827 ( पुरुष-5969, महिला- 4849, तृतीयपंथी 09)
युवा आणि महिलांच्या मतदार नोंदणीवर भर
सैनिक मतदारांसाठी देखील मतदार नोंदणी जिल्हा प्रशासन करीत असते. सैनिकांना मतदानाचे वेळी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाणे शक्य नसल्याने सैनिक मतदारांना निवडणुकीचे वेळी पोस्टाने मतपत्रिका पाठविण्यात येतात. सैनिकांना पोस्टल बॅलेट सुविधेद्वारे मतदार करता येते. जिल्ह्यात 10 जानेवारी 2017 रोजीच्या स्थितीनुसार 3099 सैनिक मतदार आहेत. या वर्षाच्या राष्ट्रीय मतदार दिवसाची थीम “Empowering Young and Future Voters” “युवा और भावी मतदाताओंका सशक्तीकरण”- “सक्षम करुया युवा व भावी मतदार” अशी आहे. आयोगाने युवा आणि महिलांच्या मतदार नोंदणीवर भर दिला आहे. ज्याचे नाव अद्यापही मतदार यादीत नाही आणि 1.1.2017 रोजी ज्या नागरीकांनी वयाची 18 वर्षे पूर्ण केली आहे अशांना मतदार नोंदणी करता येईल. यासाठी तहसील कार्यालयातील मतदार मदत केंद्राशी संपर्क साधून मतदार नोंदणी अर्ज भरुन द्यावा. अर्जासोबत वयाचा आणि रहिवास पुरावा जोडावयाचा आहे. जिल्ह्यातील युवा आणि महिलावृंद यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा आणि मतदार नोंदणी करुन घ्यावी असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी जे. आर. वळवी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकानुसार केले आहे.