धुळे । महावितरण हे ग्राहक सेवा करणारे खाते आहे. ग्राहक हेच आमचे दैवत आहेत म्हणूनच ग्राहकासाठी धुळे जिल्ह्यात 137 कोटीची कामे सुरू आहेत तर धुळे शहरासाठी 38 कोटींची वेगळी कामे सुरू होत आहेत. या शिवाय 431 कोटीच्या योजनांचा आराखडा तयार करण्यात येत असून चारशे केव्हीचे एक उपकेंद्र या जिल्हयाला देणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. धुळे येथील शाहू नाट्यमंदीर येथे गुरुवारी 14 रोजी 14 उपकेंद्राच्या लोकार्पणप्रसंगी ऊर्जामंत्री बोलत होते. यावेळी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, ग्रामविकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री दादा भुसे, रोजगार हमी योजनामंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ. हिना गावीत, महापौर कल्पना महाले, आमदार डी.एस. अहिरे, आमदार अनिल गोटे, औरंगाबाद प्रादेशिक विभागाचे सह व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया, जळगांव परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर, अधिक्षक अभियंता अशोक साळुंखे, अधिक्षक अभियंता प्रकाश पौणीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. संदिप पाचंगे व सहकार्यांनी महावितरण व थेट संवाद कार्यक्रमात पोवाडा सादर केला.
दर महिन्याला ग्राहक मेळावा
ग्राहकांच्या 47 मेळाव्यातून 818 तक्रारी आल्या. त्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण आता प्रत्येक शाखा अभियंता, उपअभियंता व कार्यकारी अभियंत्याने जनतेच्या दारात जाऊन दर महिन्याला एक ग्राहक मेळावा घ्यावा व जनतेच्या तक्रारी सोडवाव्यात. ग्राहकांची लूट होणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे. आतापर्यंत जेवढा निधी या जिल्ह्याला दिला आहे, ती सर्व कामे मार्च 2018 पर्यंत पुर्ण होतील.
15 लाखांची कामे मिळणार
ग्रामपंचायतीनी आपल्या गावातील एक आयटीआय प्रशिक्षित तरूण द्यावा त्याला प्रशिक्षण देऊन ग्राम विद्युत व्यवस्थापक होईल असे सांगून ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले शेतकर्याला छळणार्या अधिकार्याला येथे काम करता येणार नाही. विद्युत रोहित्र ने आण करण्याचे काम महावितरणचेच आहे. तसेच बेरोजगार असलेल्या बी.ई.इलेक्ट्रीकल्स तरूणाला 15 लाख रूपयापर्यंतची कामे देण्यात येत आहे. त्या तरूणाला कंत्राटदाराचा परवाना दिले जाणार आहे असेही बावनकुळे यांनी सांगितले.
थकबाकी भरावी
शेतकर्यांकडून 12 तास विजेची मागणी आहे मात्र जलसंधारण विभागाने 8 तास वीजपुरवठा द्यायचा निर्णय केला आहे. वीज वापरकर्त्यांकडे बाकी असलेली थकबाकी त्वरीत भरल्यास भारनियमन कमी होईल. शेतकर्यांनी एक रूपया दराची वीजेची थकबाकी भरावी. आम्ही दंड व व्याज बाजूला सारण्यास तयार आहेत. यापुढे 60 टक्के वसूली झाली तर भारनियमन होणार नाही. 40 टक्के वसूली झाली तर चार तास आणि 20 टक्के थकबाकी वसूली झाली तर आठ तास भारनियमन होऊ शकते.
कोळसा निर्मित वीज नाही
यापुढे शेतकर्यांना कोळशाची वीज दिली जाणार नाही, असे सांगताना ऊर्जामंत्री म्हणाले मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत धुळयातील सर्व शेतकर्यांना सौर ऊर्जा देणार आहे. पाचशे ते एक हजार शेतकर्यांचा एक गट स्थापन करून शासकीय जमिनीवर सौर ऊर्जा निर्माण करून शेतकर्यांना त्यांच्या शेतातच दिवसा 12 तास वीज मिळणार आहे.