धुळे जिल्ह्यात 21 कोटींचा पीक विमा मंजूर

0

धुळे । पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत धुळे जिल्ह्यास खरीप हंगामात झालेल्या नुकसानीपोटी एकूण 20 कोटी 59 लाख 91 हजार रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे. पीक विमा मंजूर झालेल्या शेतकर्यांनी संबंधित बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे यांनी केले आहे. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या पंतप्रधान पीक विमा योजना मार्गदर्शक सूचनांप्रमाणे राज्य शासनाने जिल्ह्यात खरीप हंगामात ही योजना लागू करण्यात आली होती.

ऐच्छिक स्वरूपाची योजना
ही योजना सर्व शेतकर्‍यांना लागू असून कर्ज घेणार्यांना सक्तीची आणि कर्ज न घेणार्या शेतकर्यांना ऐच्छिक स्वरूपाची होती. विम्यासाठी गोरेगाव (मुंबई) येथील रिलायंस जनरल इन्शुरन्स कंपनीची निवड झालेली होती. प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पीक पेरणी पासून काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणार्या घटसाठी विमा संरक्षण देत होती. त्यानुसार जिल्ह्यास खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेले नुकसान/ पावसातील खंड व हंगामाच्या अखेरीस सरासरी उत्पन्नाच्या आधारे नुकसान भरपाई निश्‍चित करण्यात आली. या निकषांतर्गत जिल्ह्यास 20 कोटी 59 लाख 91 हजार रुपये इतकी पीक विम्याची रक्कम मंजूर झालेली आहे. यापैकी धुळे तालुक्यास 6 कोटी 23 लाख 6 हजार रुपये, साक्री 3 कोटी 97 लाख 78 हजार रुपये, शिंदखेडा 10 कोटी 8 लाख 48 हजार रुपये तर शिरपूर तालुक्यास 30 लाख 59 हजार रुपये इतका पीक विमा मंजूर झाला आहे.