धुळे। वारंवार स्मरणपत्र देऊनही थकित वीजबिलाचा भरणा न केल्यामुळे धुळे जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभाग आणि सभागृहाचा वीजपुरवठा वीज वितरण कंपनीकडून खंडीत करण्यात आला आहे. परिषदेच्या दोन्ही विभागाकडे एकूण 4 लाख 22 हजार रुपयांची थकबाकी आहे. धुळे जिल्हा परिषदेकडे वीज वितरण कंपनीचे वीजबिल थकित आहे. प्रशासन विभाग आणि सभागृहातील बिलाचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना संबंधितांनी मात्र याकडे लक्ष दिले नाही व वीजबिलाचा भरणा देखील केला नाही. त्यामुळे थकित बिल 4 लाख 22 हजारांपर्यंत गेले. परिणामी वीज कंपनीच्या पथकाने सर्वसामान्य प्रशासन विभाग आणि यशवंतराव चव्हाण सभागृह येथील वीजपुरवठा खंडीत केला आहे.
खंडीत विजेने कामकाजावर परिणाम
वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता के. डी. पावरा, अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप मचिये यांच्या पथकाने ही कारवाई केली. वीज कंपनीने दिलेल्या माहितीनुसार सर्वसामान्य प्रशासन विभागाकडे एक लाख 24 हजार 760 रुपये तर यशवंतराव चव्हाण सभागृहाकडे सुमारे दोन लाख 97 हजार 651 रुपये एवढी वीजबिलाची थकबाकी आहे. दोन्ही विभागांकडे मिळून सुमारे 4 लाख 22 हजार 411 रुपये थकबाकी आहे, अशी माहिती वीज कंपनीने दिली. दरम्यान, वीजपुरवठा खंडीत झाल्यामुळे त्याचा परिणाम परिषदेतील विभागातील कामकाजावर दिसून आला. प्रशासन विभागातील अनेक कामे यामुळे रेंगाळली.