धुळे तहसिलदारांच्या स्वाक्षरीने दिले तरुणाला जीवनदान

0

धुळे- शासकीय अधिकार्‍यांबाबत सर्वसामान्य जनतेत निर्माण झालेल्या दुषित प्रतिमेस छेद देवून सर्वच अधिकारी सारखे नसतात. याचा प्रत्यय तहसिलदारांच्या एका स्वाक्षरीने आले आहे. एखादा अधिकारीने मनात ठरविले तर काय होवू शकते. याची प्रचिती तालुक्यातील लामकानी येथील अपघातग्रस्त कुटूंबाला आली. हजारो रेशनकार्डावर स्वाक्षरी करणार्‍या अधिकार्‍यांने त्या रेशनकार्डवर केलेली स्वाक्षरी एका तरुणासाठी जीवनदायी ठरली आहे.

घटना अशी आहे की, 30 सप्टेंबर रोजी धुळे तालुक्यातील लामकानी गावातील समाधान महाले हे आपल्या मित्रासोबत मोटारसाईकलने सौदांणे गावाला बहिणीकडे गेले होते. परतीच्या मार्गात त्यांची दुचाकी घसरली. या अपघातात समाधान यांच्या पायाला व डोक्याला मोठी दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी वडील व नातेवाईकांनी धुळे शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. पायाला गंभीर दुखापत झाल्याने शस्त्रक्रिया करावे लागेल असे  डॉक्टरांनी सांगितले.  शस्त्रक्रियेला  40 ते 50 हजार रुपये खर्च येईल. अशी पुर्वकल्पना रुग्णाच्या नातेवाईकांना देण्यात आली.

जखमी समाधान महाले यांच्या नातेवाईकांनी व मित्रांनी हे ऑपरेशन मा.ज्योतीबा फुले आरोग्य योजनेतून करावे अशी मागणी केली. डॉक्टरांनी ती मान्य केली. आवश्यक कागदपत्रे जमा करण्याचे सांगण्यात आले. आधारकार्ड, फोटो, रेशनकार्ड यासह आदी कागदपत्राचा रुग्णालयाकडे सुपूर्त करण्यात आली. ऑपरेशनची तयारी पुर्ण झाली होती. रुग्णाला आवश्यक सुचना देण्यात आल्या होत्या. दुपारच्या वेळी अचानक रेशनकार्डवर तहसिलदारांची स्वाक्षरी नसल्याचे रुग्णालयाच्या लक्षात आले. स्वाक्षरी घेवून या अन्याथा ऑपरेशन करता येणार नाही. अशी सुचना रुग्णालयाकडून देण्यात आली. रुग्णाची हालाकीची परिस्थिती त्यात आई-वडील अडाणी असल्यामुळे गेल्यावर्षी रेशनकार्ड तयार करण्यात आले होते. रेशनकार्डवर तहसिलदारांची स्वाक्षरी घेतली नाही. ऐनवेळेस तहसिलदार स्वाक्षरी करतील का? अशी शंका अनेकांच्या मनात निर्माण झाली.नातेवाईकांनी तहसिलदार कार्यालय काठले. कार्यालयात तहसिलदार अमोल मोरे उपस्थित होते. त्यांना नातेवाईकांनी आपबिती सांगितली. तहसिलदार मोरे यांनी याबाबत चौकशी केली. स्वाक्षरी शिवाय रेशनकार्ड कसे देण्यात आले. हा संशोधनाचा विषय होता. त्याकडे दुर्लक्ष करुन तहसिलदार यांनी कर्तव्य बजावत रेशनकार्डवर स्वाक्षरी केली. ही घटना साधी-सरळ वाटत असली तरी त्यातून व्यवस्थेचे प्रतिबिंब उमटले. समाधान महाले यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. ते आपल्या घरी सुखरुप आहेत.