धुळे तालुक्यातील ढाडरे मतदान केद्रांत दोन गटात हाणामारी

0

साहित्याची तोडफोड : सात जण ताब्यात

धुळे- जिल्ह्यातील 73 ग्रामपंचायतींसाठी बुधवारी मतदान होत असतांना दुपारी 12 वाजेच्या सुमारास धुळे तालुक्यातील ढाडरे मतदान केंद्रात दोन गटात हाणामारी झाली. या हाणामारीत मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीन खाली पाडण्यात आले. त्यामुळे मतदान केंद्रात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच धुळ्याचे तहसीलदार मोरे, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसावे यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी सात जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक वसावे यांनी दै.जनशक्तीशी बोलतांना म्हणाले.

बुथ एजंटांवरून वाद विकोपाला
ढाडरे ग्रामपंचायतीत सरपंच आणि सदस्य निवडीसाठी बुधवारी सकाळी मतदान प्रक्रिया सुरु झाली. सुरुवातील मतदान प्रक्रिया सुरुळीत सुरु होती. मात्र काही तासांनी मतदान केंद्रावरील बुथ एजंट यांच्यात मतदान करण्यासाठी येणार्या नागरीकांना त्रास होत आहे. त्यांना व्यवस्थीत मतदान करता येत नाही, मतदान यदीत नावे आणि प्रत्यक्ष मतदार यात फरक आहे, असा वाद देखील समोर आला. सुरुवातीला दोन गटातील बुथ एजंट यांच्यात वाद झाला. मतदान केंद्रावर उपस्थित मतदान अधिकार्‍यांनी दोघांची समजूत काढली. वाद घालू नका. आम्ही प्रक्रिया व्यवस्थीत पार पाडू असे सांगितले. मतदान केंद्रात वाद सुरु झाला आहे, अशी माहिती उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांना मिळाली. त्यांनी थेट मतदान केंद्रात प्रवेश करीत बुथ एजंट आणि मतदान अधिकारी यांच्याशी वाद घातला. हा गोंधळ सुरू असतांना काही समर्थकांनी मतदान केंद्रात थेट हाणामारी सुरू केली. मतदान केंद्रातील खुर्च्या, टेबल उचलून फेकले. या गोंधळात एक ईव्हीएम मशिन जमिनीवर पडले. हे पाहताच मतदान केंद्रावरील अधिकार्‍यांनी तत्काळ आपल्या वरीष्ठांना घटनेची माहिती दिली. धुळे तालुक्याचे तहसीलदार मोरे यांना माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वसावे यांनी माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक वसावे यांच्या पथकाने मतदान केंद्रात धिंगाना, मारहाण आणि मतदार केंद्रातील साहित्य फेकल्याप्रकरणी सात जणांना ताब्यात घेतले आहे.