धुळे/नंदुरबार। भारतीय घटनेचे शिल्पकार,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त आज शहर पोलीस ठाण्यासमोरील त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्याजवळ अभिवादनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात बुध्दवंदना, माल्यार्पण, मोटरसायकल-रिक्षा रॅली गरजु गरीब महिलांना साडीवाटप तसेच लोजपाचे दिलीप आप्पा साळवे यांनी चहा व कॉफि वाटप केले. आज सकाळी 7 वाजेपासूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ भीमसैनिकांनी गर्दी केली होती. पांढर्या शुभ्र वस्त्रांसह डोक्यावर निळी टोपी धारण केलेले आबाल-वृध्द यावेळी भीमवंदनेसाठी शिस्तीत येत होते. त्यामुळे पुतळा परिसर माणसांनी फुलून गेला होता. अनेक तरुणांनी गळ्यात निळे रुमाल घातल्याने त्यांचा रुबाब काही औरच होता. तर यंदा आर.एस.एस.नेही बाबासाहेबांना अभिवादन केले. आज सकाळी शासनाच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, जिल्हा पोलीस अधिक्षक चैतन्या एस., अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी हिंमत जाधव, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिवाणसिंग वसावे, शहर वाहतुक शाखेचे निरीक्षक देवरे, आझादनगरचे रमेशसिंह परदेशी, प्रांत गणेश मिसाळ, तहसिलदार ज्योती देवरे आदींनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126व्या जयंतीनिमित्त धुळ्यासह नंदूरबार जिल्ह्यात सामाजिक, शैक्षणिक व राजकीय संस्थांतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. डॉ.आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ठिकठिकाणी सकाळी धम्मध्वजारोहण, बुद्ध वंदना तथा डॉ. आंबेडकर पुतळ्यास अभिवानद करून दुपारी मिरवणूक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यासोबतच रक्तदान शिबिर, व्याख्यानमाला, भीमगितगायन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. धुळे येथे मोटरसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये महिलांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.
शहरातून मोटरसायकल रॅली
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त उत्सव समितीच्या वतीने शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती. शहरातील 80 फुटी रोडवरील गिंदोडीया चौकात असलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून या रॅलीला सुरुवात झाली. शहराची परिक्रमा करीत दुपारी उशिरापर्यंत ही रॅली सुरु होती.
गरजू महिलांना साडी वाटप
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून दलित समाजातील महिला समाजसेविका मिनाताई बैसाणे यांनी गरजू महिलांना साडीवाटप केले. आजही शेकडो महिलांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ साडीवाटप करुन त्यांनी हा उपक्रम राबविला.लोक जनशक्ती पार्टी आणि कमलाकर सांस्कृतिक क्रीडामंडळ यांच्यावतीने दिलीपआप्पा साळवे तसेच शोभाताई चव्हाण यांनी डॉ.बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणार्या भीमसैनिकांना मोफत चहा, कॉफि उपलब्ध करुन दिली. शिवाय दुपारी भोजन वाटपही करण्यात आले.
आरएसएसच्या स्वयंसेवकांतर्फे शिस्तबद्ध अभिवादन
यावेळी भीमसैनिकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ बुध्दवंदना म्हटली. तर यंदा प्रथमच आरएसएसच्या स्वयंसेवकांनी शिस्तीत येवून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ अभिवादन केले. त्यांचे शिस्तीतील संचलन सर्वांचेच लक्ष वेधून घेणारे होते. पालकमंत्री दादा भुसे, दलित समाजातील ज्येष्ठ नेते वाल्मिक दामोदर, एम.जी.धिवरे, प्रा.बाबा हातेकर, संजय पगारे, शशिकांत वाघ, रमेश श्रीखंडे, किरण जोंधळे, संजय जवराज, संजय पोळ, गुलाब पटाईत आदींसह माजी आ.राजवर्धन कदमबांडे, महापौर सौ.कल्पना महाले, सभापती कैलास चौधरी,कुमार डियालानी, इंदूताई वाघ, मुकूंद कोळवले आदींच्या उपस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ नव्याने उभारण्यात येणार्या अशोक स्तंभाचे भूमिपूजन करुन महामानवांना पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले. याशिवाय काँगे्रसचे शाम सनेर, युवराज करनकाळ, साबीर शेख, सौ.गायत्री जयस्वाल, विमलताई बेडसे, नाजनिन शेख, ज्योती पावरा, बानूबाई शिरसाठ आदींनीही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी ग.स.बँकेचे चेअरमन चंद्रकांत देसले, व्हा.चेअरमन चंद्रकांत सत्तेसा, शिवसेनेचे हिलाल माळी, गंगाधर माळी हे देखील उपस्थित होते.
दोंडाईचा शंभो ग्रुपच्या वतीने डॉ.आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार
दोंडाईचा येथील शंभो ग्रुपच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 126वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरवातीला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिकृतीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कांतीलालजी मोहिते नगरसेवक कृष्णा नगराले नगरसेवक हितेंद्र महाले, नगरसेवक चिरंजीव चौधरी, मा नगरसेवक विजय मराठे, नगरसेवक रविंद्र जाधव, संग्रामसिंग दादा, डॉ. राजेंद्र पाटील, शिवा नगराले व भीम जयंती उत्सव समितीचे कार्यकर्ता तसेच सर्व पक्षीय नगरसेवक मोठ्या संखेने उपस्थित होते. तसेच शंभो ग्रुप मित्रपरिवार व आदि मान्यवर उपस्थित होते.