धुळे परिवहन विभागातील बसेसमध्ये प्रवाशांसाठी मोफत वाय-फाय सेवा

0

धुळे । योगेश जाधव- प्रवाशी वाहतूक व्यवसायात प्रचंड स्पर्धा वाढली आहे. यामुळे प्रवाशी आपल्याकडे वळविण्यासाठी महामंडळाचे एस.टी.ने आधुनिकीकरण करायला सुरवात केली आहे. लांबपल्याचा प्रवास करायचा म्हटल्यावर अनेकजण नापसंती व्यक्त करतात. कारण त्यांच्यादृष्टीने हा प्रवास कंटाळवाणा असतो. आता मात्र धुळे विभागाने 17 मार्च पासून प्रवाशांच्या करमणुकीसाठी मोफत वाय-फाय सुविधा सुरू करून, प्रवाशांचे मनोरंजन करणे सुरू केले आहे. यामुळे मनोरंजनात्मक प्रवास सुखकर झालेला आहे.

जानेवारी 2017 पासून महामंडळाने आपल्या बसेसमध्ये वाय-फाय सुविधा सुरू केलेली आहे. धुळे विभागात 844 पैकी आतापर्यंत 667 बसेसमध्ये हे वाय-फाय यंत्र बसविले आहे. ही सुविधा यंत्र मिडीया सोलूशन मुंबई यांच्यामार्फत देण्यात येत आहे. धुळे विभागात मार्च 17 पासून वाय-फाय यंत्र बसविण्यास सुरवात झालेली आहे. या यंत्रात मराठी, हिंदी, गुजराथी भाषेचे जवळपास 10 ते 15 चित्रपट डाऊनलोड केलेले आहेत. त्याचबरोबर कॉमेडी एक्स्प्रेससोबतच इतर मराठी मालिकादेखील प्रवाशांना पहायला मिळत असल्याने प्रवाशांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. लहान मुलांसाठी कार्टन्स डाऊनलोड केलेले आहेत.

तरूणांकडून नाराजी
वाय-फाय म्हटले म्हणजे अनेकजण आपल्याला पाहिजे ते डाऊनलोड करीत असतात. मात्र एस.टी.मधील वाय-फाय हे फक्त त्यांच्याच यंत्रापुरते मर्यादीत असल्याने इतर काहीही डाऊनलोड करता येत नाही. शिवाय येथील वाय-फायचा फायदा व्हाटसअप, युट्युबसाठी,फेसबुक या सोशल माध्यमाच्या वापरता येते नसल्याने तरूणांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.या माध्यमाचा वापर करता यावा याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

धुळे विभागात 17 मार्च पासून बसेसमध्ये वाय-फाय यंत्र बसविले आहे. प्रवाशांना चित्रपट, मालिका बघता येतात. याला प्रवाशांकडून चांगल्यापैकी प्रतिसाद मिळतोय, शिवाय महामंडळाच्या योजनांचीही माहिती प्रवाशांना या माध्यमातून दिली जात आहे.
-राजेंद्र देवरे, विभाग नियंत्रक

बदलत्या काळानुसार एस.टी.ने बदलत आहे. ही आनंदाची बाब आहे. मोफत वाय-फाय सुविधा सुरू झालेमुळे. प्रवास आता कंटाळवाणा वाटत नाही. चित्रपट, मालिका, पाहुन प्रवासाचा आनंद लुटता येतो.
– मनिषा जोशी, शिरपूर