धुळे : पुण्याच्या शिवाजीनगर बस आगारातील एस.टी.चालकाने धुळे आगारात घंटी वाजवण्याच्या दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवारी रात्री उशिरा उघडकीस आली. आत्महत्येचे स्पष्ट कारण अद्याप समोर आलेले नाही. हिरामण नाथ देवरे (57, पुणे) असे मयत चालकाचे नाव आहे. याबाबत धुळे शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
कर्मचार्याच्या आत्महत्येने खळबळ
पुण्याच्या शिवाजीनगर बस आगारातील कर्मचारी हिरामण देवरे यांनी शनिवारी पुणे-धुळे बस धुळे आगारात आणली व रात्री उशिरा त्यांनी सहकारी कंडक्टरसह जेवण केले व कंडक्टर विश्रामगृहात झोपण्यासाठी गेल्यानंतर चालक देवरे यांनी एस.टी. आगारात बस लावली मात्र रात्री उशिरा त्यांनी बेल वाजवण्याच्या दोरीने गळफास घेतला. ही घटना उघडकीस आल्यानंतर एस.टी.कर्मचार्यांमध्ये मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाची ओळख पटवली आणि पुढील तपास सुरू केला. देवरे यांच्या आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. देवरे यांच्या निधनानं त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.