पोलिसांकडून तपासाला गती ; शहादा तालुक्यातील म्हसावद येथून आरोपीला अटक
धुळे :- देवपुरातील बाप-मुलाच्या दुहेरी खून प्रकरणी पोलिसांनी तपासाला गती दिली आहे़ शहादा तालुक्यातील म्हसावद येथून भगवान धनगर या संशयिताला पश्चिम देवपूर पोलिसांच्या शोध पथकाने सोमवारी सकाळी ताब्यात घेतले़ त्याच्या अटकेमुळे या प्रकरणातील भगवान धनगर हा आठवा संशयित आरोपी आहे.
देवपुरातील सरस्वती कॉलनीतील रावसाहेब पाटील (५४) आणि त्यांचा मुलगा वैभव (२१) यांच्या हत्येप्रकरणी ८ जणांविरुध्द संशयावरुन खुनाचा गुन्हा दाखल झाला आला आहे़ तपासाची चक्रे फिरवित पश्चिम देवपूर पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेची मदत घेऊन ८ संशयितांपैकी ६ जणांना अटक केली. त्यात, बाजीराव उर्फ सुभाष सजन पवार, हर्षल उर्फ दादू रवींद्र पाटील, जयराज पाटील, भुपेश उर्फ भुपेंद्र वाल्मिक पाटील या चौघांना पोलिसांनी रात्रीतून अटक केली होती़ तर जळगाव येथून ऋषिकेश पाटील आणि वैभव उर्फ सोनू पवार यांना ताब्यात घेतले होते़ सध्या या सहा जणांची रवानगी पोलीस कोठडीत आहे़ त्यांच्या कोठडीची मुदत सोमवारी संपत असून त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे़ तर आरोपींना पळून जाण्यासाठी कारची मदत करणारा संशयित दर्शन परदेशी याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणाचा तपास गतीने सुरु आहे़ पश्चिम देवपूर पोलिस स्टेशनच्या सहायक पोलीस निरीक्षक सरिता भांड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने शहादा तालुक्यातील म्हसावद येथे सोमवारी सकाळी अचानक छापा टाकला आणि भगवान धनगर या संशयिताला ताब्यात घेतले आहे़ त्याच्या अटकेमुळे या प्रकरणातील तो आठवा आरोपी आहे़