धुळे । महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच 91 टक्के कर वसुली करण्याचा प्रयत्न आयुक्त संगीता धायगुडे यांच्या प्रभावी नेतृत्व व मार्गदर्शनाखाली झालेला आहे. यासाठी सर्वाच्या मदत याबाबीसाठी कारणीभूत असल्याचे आयुक्त संगीता धायगुडे यांनी पत्रकान्वये व्यक्त केलेले आहे. धुळे महानगरपालिकेच्या स्थापनेपासून अशा प्रकारे करवसुलीचा केलेला प्रयत्न हा संपूर्ण महाराष्ट्रात नवीन पॅटर्न ठरणार आहे. आयुक्त संगीता धायगुडे यांनी सुरुवातीपासूनच यासाठी नियोजनाद्वारे कर वसुलीचा आराखडा तयार करून सुरुवात केलेली होती. त्यासाठी नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी बॅनर्स, रिक्षा वृत्तपत्रे, टी.व्ही. माध्यम याद्वारे प्रयत्न करून कर भरण्याबाबत नागरिकांना प्रवृत्त करण्यात आले. तसेच प्रत्येक मनपाच्या विभागप्रमुखांचे पथक निर्माण करून त्यांना विशिष्ट भाग ठरवून देण्यात आले. तसेच प्रसंगी अपेक्षित कर वसुली न झाल्यास कारवाईबाबतही समज देण्यात येत होती.
थकबाकीदारांवर करण्यात आली कारवाई
महानगर पालिकेच्या नागरिकांचा प्रतिसाद लाभल्याने या कर वसुली मोहीमेस यश प्राप्त झाले. या मोहीमेत लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांनीही कोणत्याही स्वरूपाचा हस्तक्षेप न करता हातभार लावला. वसुल करण्यात येणारे दंड व व्याजातून सुटका व्हावी व थकबाकीचे प्रमाण कमी व्हावे यासाठी जप्ती, मालमत्ता सिल, नळ कनेक्शन बंद करणे अशा स्वरूपाच्या कार्यवाहीतून थकबाकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी झालेले आहे. या संपूर्ण कार्यवाहीत एकूण 34 मोबाईल टॉवर, 41 मालमत्ता जप्ती व सिल करण्यात आलेल्या सुमारे 1150 नळ कनेक्शन बंद करण्यात आलेले आहेत. आयुक्त संगीता धायगुडे यांनी नियोजनबद्ध व सातत्याने समक्ष भागात फिरून आढावा व यशस्वी कार्यवाही यामुळे धुळे महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच विक्रमी वसुली झालेली आहे.
जादा काऊंटरची सुविधा
महागनर पालिकेतर्फे कर भरण्यासाठी जादा बँक काऊंटर, स्वतंत्र कर्मचारी नियुक्ती, करभरणार्यांसाठी मंडप, वाहन व्यवस्थाही करण्यात आली होती. त्याचा सकारात्मक परिणाम झाला. अधिकारी व कर्मचारी यांची इतर दैनंदिन कार्यालयीन कामकाजातून मुक्तता करून त्यांना कर वसुलीवर लक्ष केंद्रीत करण्याबाबत निर्देश देण्यात आले. मालमत्ताकर वेळेत भरणे ही आपले कर्तव्य व जबाबदारी असून ही मानसिकता तयार करण्यासाठी धुळे महानगरपालिकेमार्फत प्रयत्न केले गेले आहेत. या प्रयत्नांना उत्तम प्रतिसाद नागरिकांनी दिला आहे. कर भरण्यासाठी येणार्या नागरिकांना असुविधा होवू नये याकडे महानगर पालिकेने विशेष काळजी घेत स्वंतत्र कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली होती.