धुळे । शहरातील पेठ भागात असलेल्या नागरी समस्या सोडविण्याचे आश्वासन देवूनही प्रत्यक्षात मनपातील अधिकारी- कर्मचार्यांनी कुठलेच काम न केल्याने संतप्त झालेल्या पेठ विभागातील भाजपा कार्यकर्त्यांनी आज मनपाच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकले. तब्बल अर्धा तास हे आंदोलन चालले. त्यामुळे मनपात येणार्या आणि काम आटोपून परत जाणार्या नागरीकांचा खोळंबा झाला. भाजपाच्या पेठ विभाग मंडळकडून गेल्या आठवड्यात मनपा अधिकार्यांना नागरी समस्या सोडविण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते. यावेळी 4 दिवसात समस्या सोडवू असे आश्वासन अधिकार्यांनी दिले होते. मात्र आठवडा उलटूनही प्रत्यक्षात कुठलीच समस्या न सुटल्याने निवेदनात दिलेल्या इशार्यानुसार शहर भाजपाने आज मनपाला टाळे ठोको आंदोलन केले.
आंदोलनात यांनी घेतला सहभाग
या आंदोलनात भाजपा पेठ विभाग मंडलचे अध्यक्ष जितेंद्र धात्रकसह शिरिष शर्मा, तुषार भागवत, अमोल मराठे, अतिक अन्सारी, सागर कोडगीर, भूषण सुर्यवंशी, स्वप्निल लोकरे, सचिन कायस्त, निलेश गांधलीकर, विजय सोनवणे, सागर वाघ, विनोद जगताप, विजय गवळी, आरीफ अन्सारी, मुर्तजा अन्सारी, संजय तारगे, आकाश धात्रक, जावेद अन्सारी, मंगला कवडीवाले आदी सहभागी झाले होते.