धुळे- पायघोळ अंगरखा, पायांत विजार किंवा थोतर कमरेभोवती शेलावजा उपरणे गुंडाळलेले, एका हातात चिपळ्या, दुसर्या हातात पितळी टाळ कमरेला पांवा, मंजिरी अशी वाद्दे आणि काखेला झोळी, कपाळावर व कंठावर गंधाचे टिळे अशा वेशभूषेतील मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक शहरातील वासुदेव कलवंत सकाळी घरोघरी जावून राष्ट्रवादी पक्षांचा प्रचार करणार आहेत. महापालिका निवडणूकीत प्रचारासाठी विविध माध्यमांचा प्रचारासाठी उपयोग केला जात आहे. राष्ट्रवादी पक्षाने आधुनिक, पारंपारिकसह अन्य माध्यमांवर जोर दिला आहे. शहरासह ग्रामीण भागात भल्या पहाटे हातातील चिपळ्या वाजवित घरोघरी फिरणारा वासुदेव पाहण्याची उत्सुकता लक्षात घेऊन पक्षाने मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक येथील कलावंताना उमेदवारांच्या प्रचाराची जबाबदारी सोपविली आहे. वासुदेवाची भूमिका साकारणार्या सुप्रसिध्द 30 ते 40 कलावंत राष्ट्रवादी पक्षांचे ध्येय धोरण, उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. एका प्रभागात 4 वासुदेव सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत मतदारांचे प्रबोधन करणार आहेत. वासुदेवासह पथनाट्य सादर करणारी मंडळी देखील चौका-चौकात पथनाट्य सादर करणार आहेत. यासाठी एलएडी, वाहणे, व्हॉसअप, फेसबुक, एसएमएस, कॉल, पक्षांचे बलून, भित्तीपत्रक, हॅण्डबील, गृहभेटी अशा विविध माध्यमांतून पक्षाने प्रचारावर भर दिला आहे.