धुळे- धुळे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी यंदा 109 मतदान केंद्र वाढणार आहेत. होवू घातलेल्या पंचवार्षींक निवडणूकीत एकूण मतदान केंद्रांची संख्या 457 होणार असल्याची माहिती मनपा निवडणूक विभागाने दिली आहे. शहर हद्दवाढीमुळे लोकसंख्या वाढल्याने मतदान केंद्रांची संख्या वाढणार आहे.
शासनाने 5 जानेवारी 2018 ला शहर हद्दवाढीची अधिसूचना काढली आहे. त्यामुळे शहरावर सुमारे 75 हजार लोकसंख्येचा भार वाढला आहे. परिणामी मतदारांची संख्या देखील वाढणार आहे. शिवाय यंदा दोनऐवजी चार नगरसेवकांचा एक प्रभाग करण्यात आला आहे. त्यामुळे एका मतदाराला चार उमेदवारांना मते द्यावी लागणार असल्याने मतदानास लागणारा वेळ लक्षात घेऊन मतदान केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे.
शहर हद्दवाढीत नगाव अंशतः व वलवाडी, भोकर, महिंदळे, मोराणे, अवधान, चितोड, वरखेडी, नकाणे, बाळापूर, व पिंप्री ही गावे पूर्णतः समाविष्ट झाली आहेत. या गावांमध्ये मतदार संख्या मोठी असल्याने गेल्या निवडणूकांपेक्षा 50 मतदान केंद्र या गावांमध्ये वाढणार आहेत. या मतदान केंद्रांचे सर्वेक्षण बांधकाम विभागाकडून सुरु करण्यात आले आहे.
शाळांमधील वर्गखोल्या, साहित्य, प्राथमिक सुविधा पुरविण्यासाठीचे नियोजन या सर्वेक्षणानंतर केले जाणार आहे. त्यानुषंगाने कोअर कमिटीच्या बैठकीत सूचना देण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आता मतदान केंद्राचे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यासाठी लवकरच अधिकार्यांची नियुक्ती केली जाणार आहे. दुसरीकडे प्रभागनिहाय मतदार यादीचे कामालाही वेग आला आहे. एकूणच महापालिका निवडणूकीच्या प्रशासकीय तयारीला आता वेग आला आहे.