धुळे महापालिका निवडणूक ; 74 जागांसाठी 739 उमेदवारी अर्जांची उद्या छाननी

0

धुळे- 74 जागांसाठी होवू घातलेल्या धुळे महापालिका निवडणुकीसाठी सुधारीत अर्ज यादीप्रमाणे एकूण 739 इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. ऑफलााईन आणि ऑनलाईन असे एकूण अर्जांची माहिती संकलन करताना मनपा प्रशासनाला रात्री बारा वाजले. गुरुवारी, 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजेपासून उमेदवारांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू होणार आहे. रविवारी, 9 डिसेंबर रोजी धुळे महापालिकेच्या 74 जागांसाठी मतदान होणार आहे. 10 डिसेंबर रोजी मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. 20 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल 670 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. ऑफलाईन आणि ऑनलाईन अशी अर्जांची एकूण संख्या 739 झाली आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजेपासून उमेदवार अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू होणार आहे. गुरुवारीच उमेदवारी अर्जाची छाननी होवून वैधरीत्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. 23 ते 25 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी उमेदवारी मागे घेता येणार नाही. त्यामुळे सोमवार, 26 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यात येणार आहे. 27 नोव्हेंबर, मंगळवार रोजी निवडणूक चिन्हे नेमून देण्यात येणार आहे. त्याच बरोबर 27 नोव्हेंबर रोजी अंतिमरीत्या निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची यादी प्रसिध्द होणार आहे.