धुळे महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला

0

निवडणुकीत 50 जागांवर स्पष्ट बहुमत
आ.गोटे यांच्या पत्नी विजयी
तिघा मंत्री धुळ्यात तळ ठोकून
धुळे – धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळपासून सुरूवात करण्यात आली. यात सुरूवातीपासून या निवडणुकीत भाजपाने मोठ्या प्रमाणावर आघाडी शेवटपर्यंत राहिली. धुळे महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला आहे. 50 जागांसह स्पष्ट बहुमत मिळवत भाजपने धुळे महापालिका काबीज केली आहे. भाजपमधून बाहेर पडलेल्या अनिल गोटे यांचा लोकसंग्राम पक्ष, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, शिवसेना यांच्यात सुरू असलेली लढाई मोडीत काढली आहे.

आ. अनिल गोटे यांच्या पत्नी विजयी
अनिल गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षाला अपेक्षित यश मिळाले नसले तरी त्यांच्या पत्नी हेमा गोटे विजयी झाल्या आहेत. लोकसंग्रामच्या उमेदवारांपैकी एकमेव हेमा गोटे यांनी विजय मिळवला. हेमा गोटे धुळे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 5 ब मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. अनिल गोटे यांचे विरोधक असलेल्या मनोज मोरे यांच्या पत्नी भारती मोरे भाजपतर्फे त्यांच्याविरोधात मैदानात होत्या. अनिल गोटे यांनी पत्नी हेमा गोटे यांना लोकसंग्राम पक्षाकडून धुळ्याच्या महापौरपदाची उमेदवार घोषित केली होती. मात्र लोकसंग्राम जिल्ह्यात फारशी चमक दाखवू शकला नाही. अनिल गोटे यांचे पुत्र तेजस गोटे यांनाही पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

निवडणुकीत तिघा मंत्र्यांना यश
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, रोहयो-पर्यटन मंत्री जयकुमार रावल आणि संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे या भाजपच्या तीन मंत्र्यांनी धुळ्यात तळ ठोकला होता. त्यामुळे भाजपच्या तिन्ही मंत्र्यांना धुळ्यात विजय मिळवण्यात यश आले असल्याची चर्चा परीसरातून होत आहे.

एक जागा झाली बिनविरोध; 73 जागांसाठी झाली निवडणूक
धुळे महानगरपालिकेच्या 19 प्रभागातील एकूण 73 जागांसाठी हे मतदान झाले. एका जागेची निवडणूक बिनविरोध झाली असून एकूण 74 जागा आहेत. अनुसूचित जातीसाठी 6, अनुसूचित जमातीसाठी 5, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी 20 जागा राखीव होत्या.

पक्षनिहाय निकाल याप्रमाणे
भाजपा -५०, राष्ट्रवादी – ०९, काँग्रेस – ०५ , शिवसेना -०२ , लोकसंग्राम -०१, सपा -०२ , बसपा -०१ , एमआयएम – ०२ इतर -०२ असे एकूण- -७४ जागांसाठी निवडणूक झाली. यातील एक जागा आगोदरच बिनविरोध झाली होती. त्यामुळे ही निवडणूक 73 जागांसाठी झाली होती.