आचारसंहिता लागू: १० डिसेंबर रोजी निकाल
धुळे- धुळे महापालिका सार्वत्रिक निवडणूकीची आचारसंहिता गुरुवारपासून लागू करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 9 डिसेंबर 2018, रविवार रोजी मतदान तर 10 डिसेंबर सोमवार रोजी मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
धुळे व अहमदनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीसाठी गुरुवारी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक आचारसंहिता गुरुवार पासून लागू झाली असून निकाल जाहीर होईपर्यंत अमंलात राहील.वरील आचारसंहिता धुळे व अहमदनगर महापालिकाच्या संपुर्ण क्षेत्रात लागू राहील. मात्र निवडणूक क्षेत्रातील मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी घोषणा कोणतेही मंत्र, खासदार, आमदार, नगरसेवक किंवा इतर पदाधिकार्यांना सुध्दा करता येणार नाही.
निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. 13 नोव्हेंबर रोजी महानगरपालिका आयुक्त यांनी निवडणूक कार्यक्रमााची सूचना शासन राजपत्र व स्थानिक वृत्तपत्रात प्रसिध्द करण्याची आहे. 13 नोव्हेंबर सकाळी 11 ते 20 नोव्हेंबर दुपारी दोन वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरीता उपलब्ध राहील.
13 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र स्विकारण्याची कालावधी आहे. रविवारी 18 नोव्हेंबर रोजी नामनिर्देशपत्र स्विकारण्यात येणार नाही. 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजेपासून नामनिर्देशितपत्रांची छाननी करण्यात येणार आहे. छाननी झाल्यानंतर उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. 26 नोव्हेंबर सोमवार दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजेपासून निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येणार आहे. 27 नोव्हेंबर रोजी निवडणूक लढविणार्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. 9 डिसेंबर,रविवार रोजी सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत मतदान होणार आहे. तर 10 डिसेंबर रोजी मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे.