धुळे येथे चोरट्यांनी पोलिस निरीक्षकाचा बंगला फोडून मारला डल्ला

0

धुळे । पोलिस अधिकार्‍यांच्या वसाहतीतील एका पोलिस निरीक्षकाचा शासकीय बंगला फोडून चोरट्यांनी पोलिस यंत्रणेची उरली सुरली इभ्रत वेशीला टांगल्याच्या प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त केल्या जात आहे. मात्र, पोलिस निरीक्षकाने फिर्याद देताच अवघ्या काही तासांत शहर पोलिसांनी चोरट्यांना शोधून काढले. सर्वसामान्यांच्या बाबतीतदेखील पोलिस प्रशासन एवढी तत्परता का दाखवत नाहीत? असा रोकडा सवाल आम जनता विचारत आहे. धुळे शहर पोलिस ठाण्याचे प्रमुख पोलिस निरीक्षक डी. व्ही. वसावे यांची गुन्हेगाराला हुडकून काढण्याची एक खास स्टाईल आहे. त्यामुळेच चोरटे अवघ्या काही तासात जेरबंद झाल्याचे पोलिस वर्तुळात बोलले जात आहे.

घर बंद करून गेले होते कामावर
तालुका पोलिस स्टेशनचे प्रमुख असलेले पोलिस निरीक्षक संभाजी रामराव पाटील हे संतोषी माता ते लेनिन चौक रस्त्यावर वनविभागाच्या समोर पोलिस अधिकार्‍यांसाठी असलेल्या शासकीय निवासस्थानामध्ये राहतात. पीआय पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 27 मार्च रोजी संध्याकाळी 5 वाजता पीआय पाटील हे त्यांचे शासकीय निवास्थान बंंद करुन तालुका पोलिस स्टेशनला कामकाजासाठी गेले होते. रात्री 11 वाजता ते आपल्या निवास्थानी परतले असता त्यांना घराचा दरवाजा त्यांना उघडा दिसला.

21 हजारांचा ऐवज लांबविला
हॉलच्या पुढे असलेल्या एका खोलीतून चोरट्यांनी रोकड आणि ऐवज लंपास केल्याचे आढळून आले. चोरट्यांच्या हाती 18 हजार 500 रुपयांची रोकड, ब्लँकेटस, बॅग असा 21 हजार 200 रुपयांचा ऐवज लांबविला. पीआय पाटील यांनी ताबडतोब शहर पोलिस स्टेशन गाठून फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक वसावे यांनी अवघ्या काही तासांत मुन्ना उर्फ इरफान हसन अन्सारी याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या घरातून बॅग, ब्लॅकेट आणि रोकड जप्त करण्यात आली आहे. चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास एपीआय तोरडमल करीत आहेत.