धुळे। देवपूर भागातील शिवाजी कॉलनीत भरदिवसा तर इतर चार ठिकाणी रात्री घरफोडी करून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी देवपूर पोलिसात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. शिवाजी कॉलनीत तर भरदिवसा एका घरातून साडेतीन लाखांचा ऐवज व देवपूरातील एका घरफोडीत कुत्र्याला गुंगीचे औषध पाजून चोरीचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आले आहे. एकाच रात्री झालेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भोई सोसायटीतील प्लॉट नं.185 इंजिनियर रविंद्र पाटील यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चांदीची लक्ष्मीची मुर्ती, 1 ग्रॅम सोन्याची नथ असा ऐवज चोरुन नेला. एकाच रात्री पाच ठिकाणी घरफोडी झाल्याने चोरट्यांनी पोलिसांना एकप्रकारचे आव्हानच दिल्याचे दिसून येते.
कडीकोंडा तोडून प्रवेश
प्रताप हिलाल पाटील (60) यांचे देवपूर भागातील शिवाजी कॉलनीतील प्लॉट नं.98 मध्ये वास्तव्य आहे. काल 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजे दरम्यान पाटील हे कामकाजासासाठी बाहेर गेल्याने कडीकोंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करत कपाटातील 242 ग्रॅम वजनाचे 3 लाख 66 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. देवपूर पोलिस स्टेशनचे पीआय.शिरसाठसह कर्मचार्यांनी घटनास्थळी पहाणी केली. पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
पोळ्यानिमित्त देसले परिवार गेले होते बाहेरगावी
भगवती नगरातील प्लॉट नं.15 मध्ये रहाणारे रविंद्र रामदास देसले हे परिवारासह पोळा सणानिमित्त चिंचखेडा येथे गेले होते. या संधीचा फायदा घेवून चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडिकोंडा तोडून सामान अस्ताव्यस्त करत 400 ते 500 रुपये रोख, शालेय दप्तर व इतर साहित्य चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. कविता देसले यांनी या चोरीची माहिती पोलिसांना दिल्याने गुन्हा दाखल झाला आहे.
डॉ.निकवाडे यांच्याकडे चोरीचा प्रयत्न
तिसर्या एका घटनेत आनंदनगरातील भोई सोसायटीतील प्लॉट नं.186 मध्ये रहाणार्या डॉ.किरणकुमार निकवाडे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न झाला. तर भगवती नगराती प्लॉट नं.20 मध्ये रहाणारे नामदेव तुकाराम सैंदाणे त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आठ ते दहा हजार रुपये रोख व 5 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. अभिमन नहानु साळवे, प्लॉट नं.3 हे परिवारासह वरच्या मजल्यावर झोपले असतांना घरातील तांब्या-पितळीचे भांड्यासह इतर सामान चोरट्यांनी चोरून नेले.