धुळे शहर पोलिसांकडून चोरी झालेल्या 34 दुचाकी जप्त

0

चौघे आरोपी जाळ्यात ; धुळेसह नाशिक जिल्ह्यातून लांबवल्या दुचाकी

धुळे- धुळ्यासह नाशिक जिल्ह्यातून तब्बल 34 दुचाकी चोरणार्‍या चौघा चोरट्यांच्या धुळे शहर पोलिसांच्या शोध पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. जप्त केलेल्या दुचाकीची किंमत 10 लाख 60 हजार इतकी आहे. याबाबतची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.राजू भुजबळ, शहर पोलीस निरीक्षक गणेश चौधरी यांनी शुक्रवारी दिली. दरम्यान, दिनेश मधुकर वाघ (30), सतीश आनंदा वाघ (38, दोन्ही रा़ उभंड ता़ धुळे), आशिष राजेंद्र शर्मा (36, रा़ नाशिक) तसेच जितेंद्र दिगंबर मोहिते (35, रा़ उभंड, ता़ धुळे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केले असता आधी सात दिवसांची व नंतर पुन्हा सात दिवसांची म्हणजे 8 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

गोपनीय माहितीवरुन आवळल्या मुसक्या
धुळे शहरातील बसस्थानक, न्यायालय, जिल्हा रुग्णालय, तहसील कचेरी, गरुड कॉम्प्लेक्स आदी ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर दुचाकी चोरीला गेल्या होत्या़ दुचाकी चोरी करणारे चोरटे ठिकठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये येत होते़ परंतु ते सराईत नसल्याने त्यांची ओळख पटत नव्हती़ शहर पोलिसांच्या शोध पथकाने पेट्रोलिंग व गुन्हेगारांवर वॉच ठेवून शोध घेतला असता तालुक्यातील उभंड येथील दोन संशयीतांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी अन्य दोन साथीदारांची नावे सांगितल्यानंतर या प्रकरणाचे बिंग फुटले.

यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई उपअधीक्षक सचिन हिरे व पोलीस निरीक्षक गणेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हिरालाल बैरागी, नाना आखाडे, भिकाजी पाटील, प्रकाश पाटील, सतिष कोठावदे, कबीर शेख, मुक्तार मन्सुरी, प्रल्हाद वाघ, पंकज खैरमोडे, योगेश चव्हाण, संदिप पाटील, रवि गिरासे, राहुल पाटील, कमलेश सुर्यवंशी, तुषार मोरे, अविनाश कराड यांनी केली. दरम्यान, ज्यांच्या दुचाकी चोरीला गेल्या आहेत, अशा दुचाकी मालकांनी आपल्याकडील कागदपत्रांसह शहर पोलिसांकडे पडताळणी करावी, असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.