धुळे हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक

0

धुळे-लहान मुलांना पळवणारी टोळी समजून धुळ्यात ५ जणांना बेदम मारहाण करण्यात आली. ही मारहाणी इतकी अमानुष होती की त्यात ५ जणांचा मृत्यू झाला. धुळ्यातील साक्री तालुक्यात असलेल्या राईनपाडा गावात १ जुलैला घडली होती. या मारहाणीचे नेतृत्त्व करणाऱ्या मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. महारू पवार असे या आरोपीचे नाव आहे. याआधी या प्रकरणी एकूण २३ जणांना अटक करण्यात आली आहे. आता महारू पवारसह एकूण २४ जणांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक एम रामकुमार यांनी दिली.

ज्या जमावाने ५ लोकांना मुले पळवणारी टोळी म्हणून मारहाण केली त्या जमावाचे नेतृत्त्व महारू पवारने केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या सगळ्यांनी लाठ्या आणि रॉड घेऊन पाच जणांना मारहाण केली. आम्ही या घटनेचा व्हिडिओ पाहिला तेव्हापासूनच महारू पवारचा शोध घेत होतो अखेर त्याच्या मुसक्या आवळण्यात आम्हाला यश आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

रविवारी १ जुलैला राईनपाडा येथे आठवडी बाजार भरला होता. ५ लोक बाजाराच्या ठिकाणी एसटीतून उतरले होते. दरम्यान, त्यातील एक जण एका लहान मुलीशी बोलण्याचा प्रयत्न करीत होता. यामुळे गावातल्या काही लोकांचा ते लहान मुले पळवणारे असल्याचा समज झाला. त्यानंतर ही अफवा बाजार परिसरात पसरल्याने तेथे मोठ्या प्रमाणावर जमाव गोळा झाला. यांपैकी सुमारे ३५ जणांनी या पाच जणांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यामधील १२ जण राईनपाडा गावाचे रहिवासी होते. मारहाण इतकी क्रूर आणि बेदम पद्धतीने करण्यात आली की या मारहाणीतच या सगळ्यांचा जीव गेला. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरल झाला होता. त्यामुळे ही घटना समोर आली. सुरुवातीला लोक त्यांना चपलांनी मारत होते. त्यानंतर काही तरुणांनी त्यांना राईनपाडा गावच्या ग्रामपंचायत कार्यालयात डांबले आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली.