धुळ्याचा मद्यसम्राट दादा वाणीवर कडक कारवाई होणार!

0

मुंबई : बनावट दारूने 9 लोकांचा बळी घेतल्यानंतर अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या उपहारगृहात बनावट दारू निर्मितीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. या प्रकरणी 19 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 16 आरोपींना गजाआड करण्यात आले आहे. अद्याप तीन आरोपी फरार असून या प्रकरणात 6 राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी व 3 पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाचा मुख्य मास्टरमाईंड हा धुळ्याचा मद्यसम्राट दादा वाणी आहे. दादा वाणीला नेमके कुणाचे संरक्षण आहे असा सवाल उपस्थित करत त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी आ. एकनाथराव खडसे, अनिल गोटे, शिवाजीराव कर्डीले यांनी विधानसभेत लक्षवेधी दरम्यान केली. याला उत्तर देताना ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल माहिती घेऊन कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तसेच अहमदनगर दारूकांडातील संबधित सर्व दोषींवर कडक कारवाई करत मोक्का लावण्यासाठी देखील कारवाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मृतकांच्या परिवाराला वाढीव मदत देण्याचे आश्वासन देखील बावनकुळे यांनी दिले.

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या उपहारगृहात दारू निर्मिती
अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयातील कॅन्टीनमध्ये बनावट दारू निर्मितीचा व्यवसाय सुरु असल्याची माहिती नुकतीच उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली होती. या दारूमुळे पांगरमल येथील 10 लोकांचा मुत्यु झाला होता. या प्रकरणी जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस कर्मचारी देखील जबाबदार आहेत. या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागातील 6 तर पोलीस विभागातील 3 अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाची आरोग्य विभागामार्फत विभागीय चौकशीची शिफारस केली असून प्रकरणाशी संबंधित सर्व दोषींवर कारवाई करण्याचे ना. बावनकुळे यांनी सांगितले. यावेळी सदस्यांनी सीआयडी चौकशीची मागणी केली असता सध्या स्पेशल टीम या प्रकरणाचा तपास करत असून गरज पडल्यास सीआयडी चौकशी करू असे बावनकुळे यांनी सांगितले.

मंत्र्यांच्या माहितीमध्येच घोळ!
या प्रकरणाची माहिती देताना राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सदर रुग्णालयात हा प्रकार दोन वर्षांपासून चालत असल्याचे सांगितले तर आरोग्यमंत्री काय कारवाई करणार असा प्रश्न विचारल्यावर आरोग्यमंत्र्यांनी उत्तर देताना 2012 पासून अवैध दारू निर्मिती रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये सुरु असल्याचे सांगत दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. या प्रकरणात अनेक अनियमितता असल्याची कबुली देत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून प्रकरण सीआयडीकडे देण्याचे आश्वासनही बावनकुळे यांनी दिले.

दादा वाणीला संरक्षण कुणाचे :- आ. खडसेंचा खडा सवाल

या लक्षवेधीवर बोलताना खडसे यांनी सरकार आणि प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. यावर बोलताना आ. खडसे म्हणाले की, दादा वाणीच्या गुन्ह्यांची माहिती अनेक वर्षांपासून असून इतकी वर्षे यंत्रणेला जाग का आली नाही. यंत्रणा बांगड्या घालून बसलीय का? असा सवाल करत खडसे यांनी वाणीला पोलिसांचे संरक्षण असल्याचा आरोप केला. संरक्षण देणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. यावेळी धुळ्याचे आ. अनिल गोटे यांनी देखील दादा वाणी हा डॉन आहे. त्याला राजकीय संरक्षण असल्याचे सांगत दारूचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करतो तरीही कारवाई का होत नाही? असा सवाल उपस्थित केला. ज्या पोलीस अधिकाऱ्याच्या हद्दीत दारू सापडेल त्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणीही त्यांनी केली.