धुळे- उद्योगपती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पद्मश्री सुवालाल छगनमल बाफना यांचे बुधवारी पहाटे 4 वाजता निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. देवपुरातील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. धुळे शहरात पद्मश्री मिळवणारे ते एकमेव नेते होते. त्यांच्या निधनाने जिल्ह्यातील काँग्रेसचे मोठे नेतृत्व हरपल्याची भावना पक्षातील पदाधिकार्यांनी व्यक्त केली. धुळे-नंदुरबार संयुक्त जिल्हा असताना धुळे जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. त्या काळात डॉ. सुवालाल बाफना यांनी काँग्रेसचे सलग 10 वर्षे अध्यक्षपद भूषवले. त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने स्थानिक पातळीसह लोकसभा, विधानसभा मतदारसंघातही वर्चस्व मिळवले होते. गेल्या 15 वर्षांपासून ते राजकारणापासून अलिप्त होते. मात्र, ज्येष्ठ नेत्यांच्या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती असायची. बुधवारी त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच शहरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मंडळींनी साक्री रोडवरील त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली. त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले. सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास फुलांनी सजवलेल्या वाहनातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. देवपुरातील स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार केले. ऋषभ करिअर, सुंदर ऑटोमोबाइल, कार वर्कर्स, सॉ इंडिया आदी व्यावसायिक फर्मचे ते संचालक होते. त्यांच्या पश्चात सतीश व प्रवीण असे दोन भाऊ, बहीण, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.