धुळे। डिपॉझिट मोडून कर्मचार्यांचे पगार करणे, एक टक्का आगावू वर्गणी घेणे या बेकायदेशीर कामासह भ्रष्टाचाराचे कुरण झाल्याच्या तक्रारीनंतर डीडीआरने मजूर फेडरेशनचे संचालक मंडळ बरखास्त केले आहे. किशोर ओंकार गायकवाड, युवराज यशवंत सोनवणे आणि नंदकिशोर बबनराव येलमामे यांनी मजूर फेडरेशनमधील भ्रष्टाचार बाहेर काढला. त्यामुळेच आज मजूर फेडरेशनचे संचालक मंडळ बरखास्त झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक जे.के.ठाकूर यांनी आज महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 78(1)(2) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार धुळे जिल्हा मजूर कामगार सहकारी संस्थांचे फेडरेशनचे संचालक मंडळ बरखास्त केले आणि प्रशासकाची नियुक्ती केली.
डीडीआरचा निर्णय चुकीचा : शिवाजी पवार
जिल्हा उपनिबंधकांनी मजूर फेडरेशनच संचालक मंडळ बरखास्त करण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचे शिवाजी पवार यांनी म्हटले आहे. डिपॉझीटमधून कर्मचार्यांचा पगार केला. संचालक मंडळाचा ठराव करुन हा निर्णय घेण्यात आला. त्याला कायदेशीर आधार ही आहे. तसेच एक टक्का वर्गणी आगाऊ घेणे हा प्रशासकिय भाग आहे. त्याचा संचालक मंडळाशी संबंध नाही. त्यामुळे संचालक मंडळ बरखास्त करणे हे पुर्णपणे बेकायदेशीर आहे. त्याविरोधात आम्ही नाशिकच्या जॉईंट रजिस्ट्रारकडे अपिलात गेलो असल्याचेही शिवदादा यांनी म्हटले आहे.
1 टक्का वर्गणी रक्कम घेतली आगाऊ
विद्यमान संचालक मंडळ आणि मॅनेजर यांनी पदाचा दुरुपयोग करुन संस्थेचा पोटनियम क्र.17 चे उल्लंंघन करुन दि.19 ऑगस्ट 2015 ते 2 जुलै 2016 या कालावधीत झालेल्या सभेतील काम वाटपानुसार संबंधित प्राथमिक मजूर संस्थांना दिलेल्या कामाचा शिफारसपत्रानुसार एक टक्के वर्गणीची आगाऊ रक्कम रोखीने घेतली. त्यांना एक टक्के वर्गणी आगाऊ घेण्याचा कोणाताही अधिकार नाही. तसेच संचालक मंडळाने ठेवीची रक्कम मोडून त्यातून कर्मचार्यांचे पगार केले हेदेखील बेकायदेशीर आहे. संचालक मंडळाने 10 जुलै 2015 रोजी पदभार स्वीकारला तेव्हापासून त्यांनी सहकार खात्याचे सर्व कायदे नियम धाब्यावर बसवून कारभार सुरु केला. तक्रारीची दखल घेऊन जिल्हा उपनिबंधकानी संचालक मंडळाला नोटीस बजावली. नोटिशीतून मिळालेल्या उत्तराचे समाधान न झाल्याने आज जिल्हा उपनिबंधकांनी संचालक मंडळ बरखास्त केले. गायकवाड, सोनवणे आणि येलमामे यांच्यावतीने अॅड. धर्मराज महाजन आणि अॅड.पल्लवी गायकवाड यांनी कायदेशीर बाजू लढविली.
असे असेल प्रशासक मंडळ
प्रशासक मंडळामध्ये अध्यक्ष म्हणून एस. बी. फुलपगारे (सहाय्यक निबंधक,सहकारी संस्था साक्री) सदस्य अमोल पंडीतराव यंडाईत (मुख्य लिपीक, डीडीआर धुळे), सदस्य आनंद बाबुराव शिंदे (कनिष्ठ लिपीक, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था,धुळे) यांची नेमणूक करण्यात आली आहे. आजपासून मजूर फेडरेशनचा कारभार ते पाहणार आहेत. किशोर गायकवाड,युवराज सोनवणे आणि नंदू येलमामे यांनी गेल्या वर्षभरापासून मजूर फेडरेशनच्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई सुरु केली होती. त्यांनी डीडीआरकडे तक्रारही दिली होती.