धुळ्याच्या ‘एसएनसीयु’साठी ८७ लाख मंजूर

0

अर्भक मृत्यू रोखण्यासाठी शासनाचे पाउल

मुंबई:– राज्यात लहान मुलांच्या मृत्यूंची संख्या वाढत आहे. विशेषता नाशिकमधील वाढत्या आकडे राज्यभरात चर्चेचा विषय झाला होता. या पार्श्वभूमीवर अर्भक मृत्युदर कमी करण्यासाठी राज्य शासनाने पाउल उचलले असून राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांतील नवजात शिशु केयर युनिट (एसएनसीयु) च्या नुतनीकरण आणि बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे. १३ व्या वित्त आयोगाकडून यासाठी राज्यातील चार ठिकाणी एसएनसीयू सेंटरच्या नुतनीकरण आणि बांधकामासाठी ४१०.८८ लाखांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामध्ये धुळ्याच्या मेडिकल कॉलेजमधील एसएनसीयूच्या नुतनीकरण आणि बांधकामासाठी ८६.६० लाख रुपयांची मान्यता मिळाली आहे.

अर्भक मृत्यू रोखण्यासाठी शासनाकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. राज्यात अनेक ठिकाणी चांगल्या दर्जाच्या एसएनसीयुची आवश्यकता आहे. यासंदर्भात शासनआदेश निघाले असून या कामाची सुरुवात लवकरच होण्याची शक्यता आहे. धुळे येथे या युनिटमुळे धुळ्यासह जळगाव, नंदुरबार व नाशिक येथील नवजात अर्भकांना फायदा होणार आहे. धुळ्यासोबत सांगली, यवतमाळ व अमरावती येथील एसएनसीयूच्या नुतनीकरण आणि बांधकामासाठी देखील खर्चाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.